शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या एका दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील कामिनी ओढ्यावरील पुलावरून जात असताना सुरज अशोक राजगुरू (वय ३०) हा तरुण अचानक तोल जाऊन ओढ्याच्या प्रचंड प्रवाहात कोसळला आणि क्षणात वाहून गेला असुन. पाहता पाहता ही घटना घडल्याने गावकरी थरारले.घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसह आपत्ती मित्र पथक व स्थानिक नागरिकांनी युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न हाती घेतले. मात्र संध्याकाळी अंधार वाढल्याने शोधकार्याला अडथळा निर्माण झाला.
दरम्यान, पुढील मदतीसाठी वाघोली अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख महाजन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनास्थळी पंचायत समिती सदस्य विजय दादा रणसिंग, सरपंच डॉ. सचिन चव्हाण, उपसरपंच प्रदीप पवार, माजी उपसरपंच अजित चौधरी, माजी उपसरपंच राहुल रणसिंग शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलीस कर्मचारी संदीप कारंडे, अमोल चव्हाण, तसेच तलाठी रुके दादा, ग्रामसेवक नवले भाऊसाहेब यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित राहून शोधकार्यात मदत करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे निमगाव म्हाळुंगी परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.