तळेगाव ढमढेरेतील परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी

शिरूर तालुका

स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकल हे नेहमीच वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांच्या वतीने नुकतेच परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयास स्वामी विवेकानंद फाउंडेशनचे अध्यक्ष गोरक्षनाथ कर्हेकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांच्याकडे प्रथमोपचार पेटी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी यावेळी सामाजिक कार्यकर्ते रोहिदास ढमढेरे, आदर्श कला शिक्षक प्रवीणकुमार जगताप, विशाल कुंभार, संगीता लंघे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

शालेय मुलांना दुखापत झाल्यास शालेय विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार मिळावे या दृष्टिकोनातून तळेगाव ढमढेरे येथील स्वा. सै. आर. बी. गुजर प्रशाला, समाजभूषण संभाजी भुजबळ माध्यमिक विद्यालय, कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालय शाळा क्र. १ व २, श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी, सौ. हिराबाई गायकवाड माध्यमिक विद्यालय कासारी व आनंदाश्रम प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे या 7 प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर प्रथमोपचार करता यावेत म्हणून आवश्यक असणारे सर्व साहित्य या पेटीमध्ये देण्यात आले. तर स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकल यांनी राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आदर्श कला शिक्षक प्रवीणकुमार जगताप यांनी सांगितले.