शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक (वय ५१) हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी घडली होती. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर ११ ऑगस्ट रोजी यश आले. रांजणगाव सांडस परिसरात नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास साहेबराव मुळीक हे भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेले होते. मोटार काढण्याचा प्रयत्न करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात ते वाहून गेले. घटनेनंतर कुटुंबीय, नागरिक तसेच लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथक आणि पीएमआरडीएच्या पथकाच्या मदतीने त्यांचा शोध सुरू करण्यात आला.
दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास रांजणगाव सांडस परिसरातील पोलीस पाटलांना नदीच्या पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ याबाबत माहिती दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
मृतदेह साहेबराव मुळीक यांचाच असल्याची खात्री त्यांचा मुलगा आदेश मुळीक यांनी केली. या घटनेप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.