शिक्रापुरात खाकीतील माणुसकीचा झरा! पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी तीन वर्षीय चिमुकलीला दिले जीवदान

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि संवेदनशीलतेमुळे तीन वर्षीय चिमुकलीचे संभाव्य मोठे संकट टळले. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे शिक्रापूरसह शिरूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

ही घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शिक्रापूरमधील चाकण चौक परिसरात घडली. एक व्यक्ती तीन वर्षांच्या बालिकेसह अत्यंत मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेली असल्याचे स्थानिक नागरिक विनोद जाधव, राजू दान आणि राधेश्याम आहेर यांच्या निदर्शनास आले. चिमुकली भयभीत अवस्थेत असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना माहिती दिली.

माहिती मिळताच देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत बालिकेला सुरक्षित ताब्यात घेतले आणि तिला धीर दिला. त्यानंतर मद्यधुंद व्यक्तीच्या खिशातील कागदपत्रांमधून मोबाईल क्रमांक शोधून कुटुंबीयांशी संपर्क साधला. काही वेळातच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खात्री करून बालिकेला त्यांच्या सुरक्षित ताब्यात देण्यात आले.

वेळीच केलेल्या या हस्तक्षेपामुळे बालिकेच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा धोका टळला. आपल्या मुलीला सुखरूप पाहून कुटुंबीय भावूक झाले. “मिलिंद देवरे हे आमच्यासाठी केवळ पोलीस नाहीत, तर साक्षात पांडुरंग आहेत,” अशा शब्दांत त्यांनी देवरे यांचे आभार मानले.

या घटनेमुळे खाकी वर्दीमागील माणुसकीचा चेहरा पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे. पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांच्या कर्तव्यदक्षता आणि सामाजिक बांधिलकीचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या कार्याला सलाम व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत