दुधामध्ये विष कालवणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाईची नागरीकांची मागणी
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पारोडी येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे दुधाची आम्लता कमी करण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा व इतर घातक रसायनांचा वापर केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत उघड झाल्यानंतर तब्बल १२ हजार २७८ लिटर दूधाचा ५ लाख २८ हजार रुपयांचा साठा नष्ट करण्यात आला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, याच डेअरीवर सन २००७ मध्ये तत्कालीन पुणे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) भेसळीच्या प्रकरणात कारवाई केली होती. जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा अशाच स्वरूपाचा प्रकार समोर आल्याने संबंधित ठिकाणी भेसळीचे रॅकेट अनेक वर्षांपासून सुरू होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील पंचायत समिती सदस्यांचे पती राजू सांडभोर यांच्या सह्याद्री डेअरीवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संबंधित आस्थापना बंद करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. मात्र, स्थानिकांकडून संबंधित आस्थापना अद्याप सुरू असल्याचा दावा केला जात आहे. तसेच याही डेअरीवर काही वर्षांपूर्वी भेसळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पुन्हा अनेक वर्ष भेसळ होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राजकीय प्रभावामुळे कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होते का ? असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
याशिवाय, शिरूर येथील कैलास लाळगे तसेच पाबळ येथील विठ्ठल जाधव आणि सतीश केंजळे यांच्याविरुद्धही दूध भेसळ प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यातील दूध संकलन व प्रक्रिया व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील अनेक डेअऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी भेसळीचे प्रकार सर्रास होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दुधात रासायनिक पदार्थ मिसळून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध केवळ गुन्हे दाखल करून न थांबता कठोर शिक्षा, परवाने कायमस्वरूपी रद्द करणे आणि संबंधित मालमत्ता जप्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम राबवून गावोगावी सुरू असलेल्या संशयित डेअऱ्यांवर रात्रीच्या वेळी अचानक छापे टाकावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा भेसळीच्या या ‘दूध माफिया’चे जाळे आणखी वाढून सर्वसामान्यांच्या आरोग्यावर मोठे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.