छत्रपतींची ३३४ वी पुण्यतिथी मोठ्या थाटात संपन्न

शिरूर तालुका

बलिदान दिनास नेते गैरहजर, शंभू भक्तांसह ग्रामस्थ नाराज

शिक्रापूर (शेरखान शेख): श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा ३३४ वा बलिदान स्मरण दिन हजारो शंभू भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून या कार्यक्रमात बडे नेते गैरहजर असल्याने शंभू भक्तांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त शंभूभक्तांनी पहाटे छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय या घोषणांनी कार्यक्रमास सुरुवात झाली. दरम्यान शंभू महाराज, कवी कलश व वीर शिवले यांच्या समाधीचा महाभिषेक करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत गावातून मुक पदयात्रा काढण्यात आली.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रांताधिकारी स्नेहा देवकाते, तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली असून प्रशासनाच्या वतीने महाराजांना शासकीय सलामी देण्यात आली. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मात्र सदर कार्यक्रमास बडे नेते गैरहजर असल्याने शंभू भक्त व ग्रामस्थांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. तर हवामान बिघडल्याने समाधीस्थळी हेलिकॉप्टर मधून करण्यात येणाऱ्या पुष्पवृष्टीस अडचण आली परंतु हेलिकॉप्टर मधून शंभू राजांच्या समाधी भोवती प्रदक्षिणा घालून उंचावरूनच समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर पुरंदर वरून आलेल्या पालखीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. तर ह. भ. प. शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या कीर्तनामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास शंभू भक्तांसमोर मांडत त्यांनी धर्मासाठी केलेले बलिदान व स्वराज्यासाठी केलेली मेहनतवर प्रकाश टाकत शंभू महाराजांना अभिवादन केले.

दरम्यान आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो शंभू भक्तांनी सहभाग नोंदविला. तसेच अखिल भारतीय दहशतवाद विरोधी संघटनाचे अध्यक्ष मनिंदरसिंह बिट्टा व सुदर्शन दूरचित्रवाणीचे संपादक सुरेशजी चव्हाण यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी देखील शंभू भक्त व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे दिसून आले असून छत्रपतींची ३३४ वी पुण्यतिथी मोठ्या थाटात संपन्न झाली आहे.