अन पुजाचे कलेक्टर होण्याचे स्वप्न अखेर राहिले अधुरे

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): “माझी पोरगी लयं हुशार व्हती सायेब, तिला कलेक्टर व्हायचं व्हतं, माझ घरदार तीच पुढं घेऊन जाणारी व्हती ओ, पण तीच आम्हाला सोडून गेली, आता सारं संपलय” असा निशब्द शांततेत हुंदका ऐकला अन भिमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक प्रदिप वळसेंच्या डोळ्यात चटकन अश्रू तराळले. अन उपस्थितांनाही गहिवरुन आले. अंत्यसंस्कारावेळी जांबूत ग्रामस्थांनी सुमारे १ लाखाहून अधिक रकमेची मदत तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केली.

मयत पूजा ही मुळची शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई या गावची. घरची परीस्थिती अंत्यंत हलाखीची. मामाच्या गावात जांबुत येथे शिक्षणासाठी आलेली,जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेते, घरची परिस्थिती एकदम बेताची, आई दुसऱ्यांच्या बांधावर मोजमजुरी करते, तर वडील गावातील दुकानांमध्ये, हमालीचे काम करुन आपल्या कुटुंबाची गुजराण करतात.

या नरवडे दाम्पत्याला एकूण तीन मुली, त्यातील पूजा हि दोन नंबरची मुलगी, डोळ्यांमध्ये जराशे अंधत्व, पण शिक्षणामध्ये मात्र एकदम हुशार. दहावी आणि बारावी इयत्तेत अतिशय चांगल्या गुणाने प्राविण्य मिळवले आणि पदवीला प्रवेश घेत कलेक्टर व्हायचे स्वप्न तिने उराशी बाळगले, आई- वडिलांनाही काही प्रमाणात अंधत्वच, मात्र आपल्या प्रामाणिक कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम केले. आता मला कलेक्टर होऊन आई वडिलांचे पांग फेडायचे तिने मनाशी ठाम केले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच दडले याची पुसटशी कल्पनाही तिला आली नाही.

अचानक बिबटयाच्या रुपाने काळाने तिच्यावर घाला घातला व बिबट्याच्या हल्ल्यात तिचे दुर्दैवी निधन झाले, आणि कलेक्टर होण्याचे तिचे स्वप्न मात्र अधुरेच राहून गेले. या साऱ्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर “भीमाशंकरचे” संचालक प्रदिप वळसे पाटील मात्र भावनिक झाले, प्रसंगी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याने उपस्थितांना गहिवरून आले.

यावेळी जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांचे हस्ते कुटुंबियांना दहा लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.तर दहा लक्ष रुपयांची ठेव ठेवण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले. मात्र पोटचा गोळा गेला अन पैशाचं मोल काय ? माझी सोनी मला हवी असा हंबरडा मातेने फोडल्यावर अंगावर मात्र शहारे उभारले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सर्व बिबट्यांना तातडीने जेरबंद करा, तर शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज द्या, अजून किती जणांच्या मृत्यूची वाट बघणार? महावितरणने याची दखल घ्यावी असा आक्रमक पवित्रा घेत वनविभागापुढे मोठे आवाहन उभे केले असून प्रशासनाच्या कारवाईकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागलेले आहे.

बिबटयांचे वनविभागाच्या जागेत बंदिस्त करुन संगोपन करा. शिरुर तालुक्यात ऊसशेतीमुळे बिबटयांची संख्या मोठया प्रमाणात आहे. दररोज शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला होत आहे. नुसता एखादा बिबटया जेरबंद होऊन ऊपयोग नाही. बिबटयाचा प्रश्न ऐरणीवर आला असून या भागात त्यांचा कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. नाहीतर या भागातील नागरीकांना मोठे जनआंदोलन उभारावे लागेल, असे मत डॉ. संतोष ऊचाळे यांनी व्यक्त केले आहे..