‘कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याने रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. परंतु फिर्याद दाखल केल्यानंतर चारही आरोपी अजुनही मोकाट फिरत आहेत.

 

याबाबत आज (दि ३०) रोजी शिरुर तालुक्यातील माजी सैनिकांनी शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेत या प्रकरणातील आरोपीना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली असुन आरोपीना तातडीने अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

बोगस कागदपत्रे बनवत घेतला राजीनामा…?

करडे येथील माजी सैनिक राहुल वाळके यांच्या पत्नी रेश्मा वाळके या डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या २ सप्टेंबर २०२४ ते आजपर्यंत संचालक व भागीदार असताना कंपनीचे दुसरे संचालक व भागीदार संभाजी वाळके आणि सचिन वाळके यांनी रेश्मा वाळके यांना कंपनीच्या कोणत्याही मिटिंग मध्ये न बोलावता तसेच कोणतीही कायदेशीर नोटीसची बजावणी न करता प्रियांका वाळके यांची संचालक म्हणुन नियुक्ती केली आणि त्यानंतर लगेचच रेश्मा वाळके यांना कंपनीच्या संचालक पदावरुन बेकायदेशीररीत्या बरखास्त करण्यात आले.

 

पोलिस अधिक्षकांना करावा लागला हस्तक्षेप…?

माजी सैनिक राहुल वाळके आणि त्यांची पत्नी रेश्मा वाळके यांना आपली आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शिरुर पोलिस स्टेशनला धाव घेतली. परंतु शिरुर पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांनी थेट पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांना सांगितली. त्यानंतर पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत गुन्हा दाखल करण्यास सांगितले आणि मग शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असल्याचे माजी सैनिक राहुल वाळके यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

 

मोकाट फिरणाऱ्या आरोपीना अटक कधी होणार…?

करडे येथील माजी सैनिक आणि त्यांच्या पत्नीची आर्थिक फसवणुक केल्यानंतर गुन्हा दाखल होऊनही चारही आरोपी अजुनही मोकाट फिरत आहेत. देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी जे सैनिक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालुन पहारा देतात. त्यांच्यावर अन्याय झाल्यावर गुन्हा दाखल होऊनही पोलिसही जर बघ्याची भुमिका घेत असतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा…? असा सवाल उपस्थित करत शिरुर तालुक्यातील माजी सैनिकांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच याबाबत शिरुरचे तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन देत लवकरात लवकर चारही आरोपीना अटक करण्याची मागणी केली आहे.

 

करडे येथील माजी सैनिक यांच्या पत्नीच्या आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झाला असुन विविध कलमांच्या आधारे ज्या ज्या तरतुदी आहेत. त्या तरतुदीच्या आधारे वरिष्ठांच्या सुचना आणि मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच या घटनेतील पुराव्यांच्या आधारे आम्ही पुढील तपास करत आहोत.

संदेश केंजळे 

पोलिस निरीक्षक, शिरुर 

(क्रमश:)

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

शिरुर; उस तोडणीसाठी मजुर देण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये घेऊन फसवणुक

शिरुर शहरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरांनी हिसकावला