17 वर्षांचा खडतर प्रवास अखेर संपला; अजय हिंगे अनंतात विलीन

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे या गावचा सुपुत्र अजय विजय हिंगे (पाटील) 10 ऑगस्ट 1987 या दिवशी जन्मलेला हा 35 वर्षाचा तरुण मंगळवार (दि 11) रोजी हे जग सोडुन गेला. परंतु “मरावे परी किर्तीरुपी उरावे” या म्हणीचं मात्र त्याने सार्थक केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ अमोल कोल्हे, रुपाली चाकणकर, आमदार अशोक पवार यांच्या सहित राष्ट्रवादीचे सगळे दिग्गज नेते या ‘अवलियाला’ ओळखत होते. नुसते ओळखत नव्हते तर अनेकजण अजयला प्रत्यक्ष भेटायला सुद्धा येत होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. त्याने आख्या महाराष्ट्रात सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळे त्याच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

अजयचा जीवनप्रवास…

अजयचं प्राथमिक शिक्षण न्हावरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण गावातील मल्लिकार्जुन महाविद्यालय येथे झाले. बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मध्ये एका खाजगी कंपनीत अजयला नोकरी मिळाली. इतर युवकांप्रमाणेच अजय नोकरी करताना भविष्याची स्वप्न रंगवू लागला. परंतु नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होत. सगळ काही सुरळीत सुरु असताना अचानक 20 जुन 2006 साली अजयचा जीवघेणा अपघात झाला आणि सगळंच संपलं. अजयवर तीन महिने पुण्याच्या बुधराणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. इतके दिवस उपचार करुनही अजय पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहीन याची शाश्वती स्वतः डॉक्टरही देत नव्हते. अजयच्या मणक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्याला इथुन पुढे कायमस्वरुपी झोपुनच रहावे लागणार हाच एक मार्ग सांगण्यात आला. त्यामुळे अजयच्या कुटुंबियांना मोठा धक्काचं बसला. अजय हताश अवस्थेत छताकडे पाहत किती दिवस असे हे असं असहाय आयुष्य जगायच याचा विचार करत एक एक दिवस वर्षासारखा काढत होता.

आमदार अशोक पवारांमुळे मिळाली नवी दिशा…

त्यावेळी आमदार अशोक पवार अजयचे चुलते गोपाळराव हिंगे यांच्यासह अजयला भेटायला त्याच्या घरी आले. त्यांनी अजयला धीर देत “रिकामे डोक हे सैतानाच घर असत” याची जाणीव करुन दिली आणि नुकत्याच येऊ घातलेल्या सोशल मिडियामध्ये स्वतःला गुंतवून घेण्याचा लाखमोलाचा सल्ला दिला. बसल्या जागेवर कायम आजारपणाचाच विचार डोक्यात आणि मनात येऊन तु आणखी खचून जाशील, तू उभा राहू शकतोस, आपण प्रयत्न करु म्हणत अशोक पवार यांनी शाब्दिक आधार दिला. त्यानंतर अजयचं सगळ जीवनच बदलून गेल. लागलीच ते शब्द प्रत्यक्षात उतरवत आमदार पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीम मध्ये अजयला काम करण्याची संधी मिळवून दिली आणि हळूहळू स्वतःचे दुःख विसरत पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेत असताना अजयच्या मनाला उभारी येत गेली. अजयच्या जीवनात अंधार होता. पण अशोक पवार यांच्यामुळे त्याच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि त्याचं जीवन प्रकाशमय झालं.

सोशल मिडीयामुळे राज्यात ओळख…

घरीच बेडवर बसल्या जागी काम करत असताना मनाला उभारी देणारे आणि समाधान वाटेल असे अजयचे आयुष्य नव्याने सुरु झाले होते. एकाकीपण आणि अधुपणाचे दुःख मनातून हळूहळू पुसले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सेलचा सरचिटणीस म्हणून काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांसोबत आता अजयच्या ओळखी वाढल्या होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी अजयचा अत्यंत जवळून संबंध आला. शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आले की त्यांची अजयसोबत भेट ठरलेलीच असायची अनेक दिग्गज नेते वेळोवेळी अत्यंत आपुलकीने फोन तसेच व्हिडिओ कॉलद्वारे अजय सोबत संवाद साधायचे तसेच त्याला मार्गदर्शनही करायचे. त्यामुळे अजयला सोशल मिडीयाचं काम करताना एक वेगळीच ऊर्जा मिळायची. अजयने सोशल मीडिया सारख्या माध्यमाचा वापर करायला सुरूवात केली. आणि बघता-बघता अजय हिंगे हे नाव तालुक्याच्याच नाही तर राज्याच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचल. सोशल मीडियावरचं त्याचं काम पाहून राज्यातून अनेक लोकं त्याला भेटायला यायची. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाचं सरचिटणीस पद देऊन पक्षानं त्याचा यथोचित असा सन्मान केला.

खासदारांनी वाढदिवसाला दिली अनोखी भेट…

खासदार सुप्रिया सुळे यांनी न्हावरे येथील राष्ट्रवादीचे सोशल मिडियाचे सुदर्शन जगदाळे यांना काही दिवसांपुर्वी ऑटोमॅटिक व्हीलचेअर भेट दिली व त्यामुळे तब्बल 14 वर्षानंतर सुदर्शन जगदाळे स्वतःच्या पायावर उभे राहू शकले. हि गोष्ट शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी लगेचच त्यांच्या टीमला कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर खासदार कोल्हे यांचे स्वीय सहायक नाना सावंत, सुप्रिया सुळे यांच्या सोशल मीडिया टीमचे समन्वयक, स्टर्लिंग सिस्टिमचे संचालक सतिश पवार यांच्यासह खासदार कोल्हे यांच्या संपूर्ण टीमने अथक प्रयत्न करुन आवश्यक त्या शासकीय परवानग्या, कागदोपत्री पूर्तता करत अजयला सुद्धा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच गिफ्ट म्हणुन ऑटोमॅटिक व्हीलचेअर मिळवून दिली. त्यामुळे तब्बल १५ वर्षांनंतर अजय हिंगे ऑटोमॅटिक व्हीलचेअरच्या साह्याने स्वतःच्या पायावर उभे राहु शकले.अजय हिंगे याचे सोशल मीडियावर अतिशय प्रभावीपणे काम चालू होत. चार भिंतीच्या आत राहून सुद्धा अजय महाराष्ट्राला परिचीत झाला होता. सर्वजण आदराने त्याला अजयशेठ म्हणायचे. गेल्या काही दिवसांपासून तो सारखाच आजारी पडायचा त्यामुळे त्याच्यावर पुण्यातील जहांगीर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्टा करुनही अजयचा १७ वर्षांचा खडतर प्रवास संपला. मंगळवार (दि 11) रोजी अजयने जहांगीर हाॅस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. आज मंगळवार (दि 12) रोजी दुपारी 12 वाजता त्याच्यावर न्हावरे येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अजयचा 17 वर्षांचा खडतर प्रवास अखेर संपला.