शिरुर तालुक्यातील निखिल इचके मृत्यू प्रकरणात “अपघात की घातपात…?”

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील युवक निखिल संदीप इचके यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असुन, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची अधिकृत दखल घेतल्याने पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आयोगाने केस क्रमांक ३१८६/१३/२३/२०२६ अंतर्गत प्रकरण नोंद करुन संबंधित यंत्रणांकडुन अहवाल मागविल्याची माहिती समोर आली आहे.

निखिल इचके यांचा मृत्यू हा साधा रस्ता अपघात नसून, प्रेमविवाहाच्या रागातुन रचलेल्या पुर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच स्थानिक पोलिसांकडुन निष्पक्ष तपास होत नसल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर आयोगाने थेट हस्तक्षेप केल्याने या प्रकरणाची चर्चा संपुर्ण पुणे जिल्ह्यात सुरु झाली आहे.

प्रेमविवाह ठरला का जीवघेणा…?

इचके कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, निखिल याने प्रेमविवाह केला होता. मात्र या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. विवाहानंतर मुलीला जबरदस्तीने माहेरी नेण्यात आल्याचा आरोप इचके कुटुंबाने केला आहे. इतकेच नव्हे तर “त्याला जिवंत ठेवणार नाही,” अशा धमक्या वारंवार दिल्या जात असल्याचा दावा निखिल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मयत निखिल यांना संबंधित तरुणीकडुन फोनवरुन आपण गर्भवती असुन माहेरी छळ सहन करत असल्याची माहिती दिली गेली होती, असा धक्कादायक दावा पालकांनी केला आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणामागे कौटुंबिक वैमनस्य आणि दबावाचे गंभीर धागेदोरे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

निखिलचा अपघात की घातपात…?

निखिलचा कथित अपघात ज्या ठिकाणी झाला, ते ठिकाण मुलीच्या माहेरच्या गावाजवळ असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. विशेष म्हणजे, अपघातावेळी निखिल यांच्यासोबत असलेल्या मित्राला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर अपघात इतका भीषण होता, तर दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ जखमही कशी नाही…?” असा सवाल निखिल यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.

मोबाईल डेटा डिलीट; इलेक्ट्रॉनिक पुरावे गायब…?

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निखिल यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप डेटा डिलीट झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का…? असा संशय व्यक्त होत आहे. तसेच CCTV फुटेज, कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची सखोल तपासणी करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “तपासात जाणीवपूर्वक ढिलाई केली जात आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

स्थानिक तपास यंत्रनेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह…?

“आम्हाला स्थानिक तपास यंत्रणेवर विश्वास उरलेला नाही,” असे इचके कुटुंबियांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून न होता विशेष तपास पथक (SIT) किंवा CBI मार्फत व्हावा, अशीही मागणी निखिल यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, पुढील १५ दिवसांत दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निखिल यांच्या आई जनाबाई इचके आणि वडील संदीप इचके यांनी दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपामुळे तपासाला वेग…?मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची थेट दखल घेतल्याने आता या प्रकरणातील तपासावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. आयोगाकडुन मागविण्यात आलेला अहवाल, पोलिसांची भूमिका आणि पुढील कायदेशीर कारवाई याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निखिल इचके यांच्या मृत्यूमागचे खरे कारण नेमके काय…? हा अपघात होता की नियोजनबद्ध घातपात…? या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणार आहेत. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत