शिरुर (अरुणकुमार मोटे): कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित एक रुपयात पीक विमा योजनेत शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून या योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शिरूर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा मिळण्यासाठी पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
खरीप हंगाम असूनही जुलै महिन्याच्या मध्यावर पाऊस न पडल्याने तालुक्यात अगदीच नगण्य पेरण्या झालेल्या आहेत. तालुक्याच्या काही भागात पावसाचे आगमन झाले असून खरीपातील पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे असताना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शासनाने जाहीर केलेल्या एक रुपया पीक विमा योजनेतून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकेल. टाकळी हाजी परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱयांनी बाजरी, भुईमूग, मूग ,उडीद, तुर अशा पिकांचा विमा उतरवून या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी पर्यवेक्षक अंकुश परांडे व कृषी सहायक टी बी समरीत यांनी केले आहे.