संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडीस

क्राईम महाराष्ट्र

पहिली घटना! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाऊजीनेच केला मेहुण्याचा खून

संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील पिशोर जवळ असलेल्या तपोवन गावात दारूवरून भाऊजी-मेव्हण्यात झालेल्या वादात मेव्हण्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजीत अंकुश माळी (वय ४५ रा.घुसर ता.कन्नड ह.मू. तपोवन शिवार) असे मृताचे नाव आहे. तर नंदू बाबू गायकवाड (रा.तपोवन शिवार ता.कन्नड) असे आरोपीचे नाव आहे.

दारूला पैसे तर दिले नाही वर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपी नंदूने साल्याच्या मानेवर दोन-तीन वार केले. यामुळे रंजित जागेवर मृत झाला. घटनेनंतर शेजारील डोंगरात मेहुणा नंदू पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे व पोलिस उपनिरीक्षक सतीश बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दुसरी घटना! सासरच्या मंडळींकडून जावयावर लाठ्याकाठ्या अन् चाकूने वार करून खून…

अंबेलोहळ येथे पती-पत्नीच्या वादातून पहिल्या पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी जावयाला बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या जावयाचा घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत खुनाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळेस संतप्त नातेवाईकांनी पोलिसांच्या गाडीलाच घेराव घातला. पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी चौघांवरती गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांवरदेखील उपचार सुरू आहे. तर 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.