वाट चुकलेला चिमुकला महिला दक्षता समिती आणि पोलिसांमुळे वडिलांकडे सुखरुप परतला…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): स्थळ… शिरुर येथील पुणे-नगर बाह्यवळण महामार्ग… साधारण सहा वर्षांचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत रस्त्याने चाललेला. तेवढ्यात काही सामाजिक कार्यकर्त्यांची नजर या चिमुकल्यावर पडते. मग ते त्याच्या जवळ जाऊन त्याची विचारपुस करतात. पण हा लहानगा घाबरलेला असल्याने स्वतःच नाव किंवा वडिलांच नाव काहीच सांगत नाही. मग ते सामाजिक कार्यकर्ते त्याला उचलून घेतात आणि थेट पोलिस स्टेशन गाठतात. तिथं महिला दक्षता समितीच्या महिलांकडे त्याला सुपूर्त करतात आणि थोड्याच वेळात सोशल मीडियावरुन त्याच्या पालकांची माहिती काढुन त्याला वडिलांच्या स्वाधीन केले जाते.

अगदी सिनेमाची कथा वाटावी अशीच एक घटना सोमवार (दि 27) रोजी शिरुर मध्ये घडली. शिरुर येथील नगरपालिकेच्या शाळेत इयत्ता पहिलीत नव्यानेच दाखल झालेला एक चिमुकला दुपारच्या सुट्टीत खेळत असताना चुकून शाळेच्या बाहेर पडला आणि चुकला. हा चिमुकला चालत चालत थेट शिरुरच्या बाहेरुन जाणाऱ्या पुणे-नगर बाह्यवळण रस्त्यावर पोहचला. परंतु वाट चुकलेला हा चिमुकला सामाजिक कार्यकर्ते संतोष दिवेकर, ऋषिकेश रेड्डी, स्वप्नील रेड्डी, संदीप गायकवाड यांना रस्त्याने एकटाच रडत जाताना दिसला. त्यानंतर या सर्वांनी त्याच्याकडे चौकशी करत त्याच्या पालकांचे नाव विचारले. परंतु चिमुकला घाबरल्याने तो फक्त रडतच होता. त्यानंतर या सर्वांनी त्याला शिरुर पोलिस स्टेशन येथे आणले.

त्यावेळी महिला दक्षता समितीच्या पुणे जिल्हा सदस्या शोभना पाचंगे, अध्यक्षा राणी कर्डिले, उपाध्यक्षा शशिकला काळे, या सर्वांनी त्या मुलाला जवळ घेत त्याला आधार दिला. त्यानंतर त्याला खाऊ देत त्याच्याशी संवाद साधला असता. त्याने त्याचे नाव अमन संजय प्रजापती असे सांगितले. अमनने नाव सांगितल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या घरचा पत्ता शोधण्यात आला. त्यानंतर त्यांच्या वडिलांना संपर्क करुन शिरुर पोलिस स्टेशन येथे बोलवण्यात आले. सदर मुलाचे वडील पोलिस स्टेशनला आल्यानंतर त्याने त्यांना ओळखले. अमनचे वडील रिक्षा चालक आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि महिला दक्षता समिती यांची पुर्ण खात्री पटल्यानंतरच संजय प्रजापती त्यांच्याकडे अमनला सुपूर्त करण्यात आले.

यावेळी शिरुर पोलिस स्टेशनचे गोपनीय अधिकारी राजेंद्र गोपाळे यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि महिला दक्षता समितीचे आभार मानले. तसेच सर्व पालक आणि शिक्षकांनी आपापल्या मुलांची काळजी घ्यावी. तसेच शाळा सुटल्यानंतर किंवा मधल्या सुट्टीत आपले पालक आल्याशिवाय एकटे किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शाळेच्या बाहेर जाऊ नये अशा मुलांना सुचना द्याव्यात सांगावे म्हणजे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत असे सांगितले.