शिरुर तहसिलकडून नवीन रेशनकार्डसाठी नागरीक वेठीस; रेशनिंगच्या धान्याचाही होतोय काळाबाजार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसिल कार्यालयात नवीन रेशनकार्ड, दुबार रेशनकार्ड मिळण्यासाठी नागरिकांनी गेल्या सहा महीन्यापासून लेखी अर्ज केले होते. परंतु रेशनिंग कार्ड उपलब्ध नसल्याने नागरिकांवर वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. रेशनकार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा. शासनाने ऑफलाईन रेशनकार्ड देणे पुर्णपणे बंद केले आहे असे उत्तर शिरुर पुरवठा विभागाकडुन देण्यात येत आहे.

 

रेशनकार्ड धारक ऑनलाईन अर्ज भरायला गेल्यावर सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे प्रक्रीया अपलोड होत नाही. तसेच शिरुर तालुक्यातील हजारो रेशनकार्ड ऑनलाईन झालेले नाहीत. त्यामुळे रेशनकार्ड मधील नाव कमी, वाढवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे तात्काळ ऑफलाईन रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी शिरूर तालुक्यातील नागरिक करत आहेत.

 

तसेच शिरुर गोडावून, वाहतुकदार व रेशनिंग दुकानदारांकडून धान्याचा मोठा काळाबाजार होत असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात धान्य काळया बाजारात विक्रीसाठी जात आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. अनेक रेशनकार्डधारकांनी निकषानुसार काही महिन्यांपुर्वी स्वखुशीने अर्ज करुन धान्य बंद करण्यासाठी अर्ज देवून शिधा घेणे बंद केले होते. परंतु अजून बरेच धनदांडगे निकषाला डावलून शिधा घेत असुन पुरवठा विभाग त्यांच्यावर कधी कारवाई करणार…? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत असुन जर निकषाप्रमाणे अंमलबजावणी केल्यास सत्तर टक्के नागरिक या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.