संभाजीनगर जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास मनाई आदेश जारी…

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले असून हे आदेश 15 जानेवारीपर्यंत अंमलात असतील.

या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे, विना परवानगी पाच पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना असतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांनी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या नियम ५ च्या उपनियम (३) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक याचा वापर (श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या सारख्या बंद जागा तसेच शांतता क्षेत्र वगळून) ध्वनिची विहित मर्यादा राखून १५ दिवस शिथील करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार सन २०२४ मध्ये शिथिलता द्यावयाचे १५ दिवस निश्चित करण्यात आले असून या दिवशी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी निर्गमित केले आहेत.

शिथिलतेसाठी निश्चित केलेले दिवस खालील प्रमाणे

शिवजंयती सोमवार दि. १९ फेब्रुवारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवार दि. १४ एप्रिल, श्रीगणेश चतुर्थी शनिवार दि. ७ सप्टेंबर, ज्येष्ठागौरी पूजन बुधवार दि. ११ सप्टेंबर, अनंत चतुर्दशी मंगळवार दि. १७ सप्टेंबर, ईद ए मिलाद सोमवार दि. १६ सप्टेंबर, अष्टमी शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर, नवमी शनिवार दि. १२ ऑक्टोंबर, दिवाळी (लक्ष्मीपूजन) शुक्रवार दि. १ नोव्हेंबर, ख्रिसमस बुधवार दि. २५ डिसेंबर, मंगळवार दि. ३१ डिसेंबर. या शिवाय उर्वरित चार दिवस राखीव असून कार्यक्रमांच्या गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सूट दिली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नायलॉन मांजाः निर्मिती, विक्री व वापरावर बंदी

मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्यासाठी वापर होणाऱ्या नायलॉन मांजा निर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी निर्गमित केले आहेत. नायलॉन मांजा वापरामुळे पशु, पक्षी यांना तसेच पादवारी, वाहनधारक यांना मांजात अडकून होणाऱ्या अपघाताची शक्यता असते. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात खंडपीठात याचिका दाखल असून त्यासंदर्भात निर्देशानुसार हे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. दि. २ ते १८ हे आदेश लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.