शिरुर तालुक्यात जामीनावर बाहेर असलेला आरोपी करतोय परस्पर जमिनीची विक्री…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील एका महिलेच्या नावावर असणाऱ्या जमीनतील MIDC चा शिक्का काढण्याचे आश्वासन देत वाडेबोल्हाई येथील एका जमीन खरेदी विक्री व्यावसायिकाने संपुर्ण क्षेत्राचे साठेखत आणि कुलमुखत्यार दस्त करुन घेतले. तसेच साठेखत मध्ये जमिनीची किंमत 52 लाख रुपये ठरवत त्यातले 20 लाख रुपये न देता जमिनीची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याने हिंदवी डेव्हलपर्सचे शाम परिमल गावडे याच्या विरोधात जमिनीच्या मालक हेमलता जासूद यांनी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे कारेगाव-करडे रस्त्याच्या कडेला बाभुळसर खुर्द येथील गट नंबर 521 मध्ये 0.95 आर हे संपुर्ण क्षेत्र हेमलता जासूद यांच्या मालकीचे असुन दि 30 जानेवारी 2006 रोजी त्यांनी हि जमीन खरेदी केली. त्यानंतर दि 23 एप्रिल 2007 रोजी या जमिनीवर MIDC चा शेरा पडला. त्यानंतर वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील हिंदवी डेव्हलपर्सचे शाम परिमल गावडे यांनी गट नं 521 च्या सातबारा उताऱ्यावरील MIDC संपादित इतर हक्कातील शेरा काढुन जमीन विकत घेतो असे सांगत जासूद यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दि 24 मे 2017 रोजी गट नं 521 या संपूर्ण गटाचे साठेखत आणि कुल मुखत्यार दस्त करुन घेतला. त्यावेळी साठेखत मध्ये जमिनीची किंमत 52 लाख रुपये ठरल्याने शाम गावडे याने वेगवेगळ्या तारखांचे चेक दिले. परंतु त्यातील 20 लाखांचे चेक त्याने बँकेतुन वटलेले नसल्याने 50 लाखांपैकी 30 लाख रक्कम हेमलता जासूद यांना मिळाली. 20 लाख रुपये रक्कम देणे असतानाही तसेच गट नं 521 च्या सातबारा उताऱ्यावर MIDC चा संपादित शेरा असतानाही दि 10 ऑगस्ट 2017 रोजी आमच्यातील व्यवहार पुर्ण झाला असं खोटं नमुद करुन गावडे याने स्वतःच्या नावाने दस्त करुन घेतला.

शाम गावडे याच्या नावाची सातबारा उतारावर नोंद नसताना सदर भूखंडाचे एक-एक गुंठयाचे बेकायदेशीर प्लॉट करुन सन 2017 ते 2019 च्या दरम्यान 30 लोकांना विकून त्याचे दस्त केले आहेत. तसेच जासूद यांनी राहिलेल्या पैशाबद्दल विचारले असता जासूद यांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला खंडणी वसुलीची खोटी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे हेमलता जासूद यांनी न्यायलयात धाव घेतली. सध्या न्यायालयात या केसचा निकाल प्रलंबित असल्याने तसेच शाम गावडे हा जामीनावर बाहेर असल्याने तो अजुनही या जमिनीचे दस्त करुन जासूद यांचे आर्थिक नुकसान करु शकतो.

त्यामुळे शाम गावडे याने परस्पर जमीनविक्री करुन बेकायदेशीर दस्त करु नये यासाठी हेमलता जासूद यांनी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय तसेच शिरुर तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदनाद्वारे लेखी तक्रार केली आहे. याबाबत तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक पिसाळ यांच्याशी संपर्क साधला या प्रकरणाबाबत मला काहीही माहिती नसुन मी याची संपूर्ण माहिती घेतो असे “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.