विठ्ठलवाडीतील बंधाऱ्यावरुन व्यक्ती गेला दुचाकीसह वाहून

शिरूर तालुका

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरुन जाणारा एक व्यक्ती दुचाकी सह नदीच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास घडली असून दिवसभर शोध कार्य करुन देखील वाहून गेलेल्या व्यक्ती बाबतची काहीही माहिती मिळू शकली नसल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रामध्ये मासेमारी करणारा एक व्यक्ती मासेमारी करत असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सांगवी सांडस बाजूने दुचाकीहून आलेला एक व्यक्ती दुचाकीसह पाण्यामध्ये पडून वाहून गेल्याचे दिसून आले. घटनेची माहिती काही वेळात सर्वत्र पसरताच पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, पोलीस पाटील शरद लोखंडे, माजी उपसरपंच महेंद्र गवारे, मंडलाधिकारी राजेंद्र आळणे, वैभव गवारे यांसह आदींनी सदर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शोध सुरु केले.

unique international school
unique international school

तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशामक दलाचे सचिन गवळी, अंबादास घनवट, उमेश फाळके, अक्षय बागल, तेजस डोंगरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाण्यामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. मात्र वाहून गेलेला व्यक्ती मिळून आला नाही. तसेच सदर व्यक्तीच्या नावाबाबत देखील काहीही माहिती मिळाली नाही. सध्या भीमा नदीतून ७०३४ क्युसेस ने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने व्यक्तीच्या शोध कार्यात अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. मात्र दिवसभर शोध कार्य सुरु असून देखील पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीबाबत काहीही शोध लागला नसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर नदीच्या आजूबाजूला काम करणाऱ्या तसेच पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.