जुन्या पेन्शन योजनेच्या संपामुळे नागरीकांचे होतायेत प्रचंड हाल…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): जुनी पेन्शन योजनेसाठी संप पुकारल्याने गेल्या ७ दिवसापासून शिरूर तहसिल कार्यालतील पुरवठा विभाग, सेतू विभाग, तलाठी कार्यालय व विविध संकलंन विभाग, दुय्यम निंबधक, कृषी विभाग, पंचायत समिती, भुमिअभिलेख कार्यालय बंद असून या विभागातील नागरीकांची विविध कामे संपामुळे मोठया प्रमाणावर खोळंबली आहे. तसेच तालुक्यातील गेल्या 7 दिवसापासून जिल्हा परीषद प्राथमिक शाळा शिक्षक संपात सहभागी असल्याने शिक्षकांअभावी बंद असून माध्यमिक शाळांचे शिक्षकही या सपांत सहभागी होत असून ऐन परीक्षेच्या कालावधीत या शाळाही बंद होण्याच्या मार्गावर आहे.

तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय पुर्णपणे बंद असल्याने जमिन खरेदी विक्री व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले असून शासणाचा महसुल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने संपामुळे पंचनामे होऊ शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या कालावधीमध्ये तालुक्यातील अनेक गावात यात्रा -जत्रांचे उत्सव आहेत.

प्रत्येक यात्रेमध्ये बैलगाडा शर्यत होत असते.परंतू संपामुळे मंडल आधिकारी, कर्मचारी रजेवर असल्याने पंचनामा व अहवाल न मिळाल्याने बैलगाडा शर्यतीसाठी शासकीय परवानगी मिळवणे अवघड होत आहे. एकुणच या संपामुळे नागरीकांचे, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून शासणाने पुढाकार घेऊन या संपावर तोडगा काढणे गरजेचे आहे.