आज बेलवंडी फाटा इथं आमदार निलेश लंके यांच्या हस्ते भाजीपाला मार्केटचे उदघाटन

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तरकारी खरेदी विक्री पहाटे चार वाजता करण्याच्या प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळे वेठीस धरल्या गेलेल्या पारनेर व श्रीगोंदा तसेच शिरुर तालुक्यातील तरकारी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार निलेश लंके हे धावून आले असुन या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आज शुक्रवार (दि 25) रोजी दुपारी पाच वाजता बेलवंडी फाटा येथे स्वतंत्र तरकारी मार्केट सुरू करण्यात येणार आहे. निलेश लंके प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेलवंडी फाटा येथे दोन एकरामध्ये या मार्केटची उभारणी केली असून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सायंकाळी 6 च्या दरम्यान तरकारी मालाची खरेदी-विक्री करण्यात येते. यावेळी शिरुरसह शेजारील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरीही आपला तरकारी माल या बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येतात. परंतु तरकारी मालाची विक्री सायंकाळी न करता पहाटे चार वाजल्यापासून सुरू करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. त्यामुळे विशेषतः पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. कडाक्याच्या थंडीत पहाटे चार वाजता तरकारी घेऊन शिरूर येथे पोहचणार कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे बाजार समितीने सायंकाळची वेळ बदलून पहाटेची करु नये अशी शिरुर, पारनेर व श्रीगोंदा येथील बहुसंख्य शेतकऱ्यांची मागणी होती.

यातुन तोडगा काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी यांच्यात दोनवेळा बैठक झाली. परंतु त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. तरकारी विक्रीसाठी सायंकाळी 6 ची वेळ करा अशी बहुसंख्य शेतकऱ्यांची मागणी असताना बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आडमूठपणाची भुमिका घेत पहाटे चार वाजता तरकारी विक्रीची वेळ ठरवत तसे परिपत्रक काढुन सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. तसेच बाजार समितीचे सगळे दरवाजे शेतकऱ्यांसाठी सायंकाळी बंद केले. तरीही शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या बाहेर सायंकाळी 6 नंतर बाजार भरवून मालाची विक्री केली.

आमदार निलेश लंकेनी घेतली दखल…
शेतकऱ्यांच्या या व्यथा आमदार निलेश लंके यांच्यापर्यंत पोहचविण्यात आल्यानंतर त्यांनी मंगळवार (दि 22) रोजी तरकारी माल घेऊन शिरुरमध्ये थांबलेल्या पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच शिरुर बाजार समिती प्रशासनाची संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दिलाच पाहिजे अशी भूमिका आमदार नीलेश लंके यांनी घेतली. यावर काय तोगडा काढला पाहिजे अशी विचारणा केली गेली असता दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयीचे ठरेल असे बेलवंडी फाटा येथे तरकारी मार्केट सुरू करण्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी लंके यांच्याकडे केली. त्यानंतर व्यापाऱ्यांशीही लंके यांनी संवाद साधला. व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविल्यानंतर येत्या चार दिवसांत बेलवंडी फाटा येथे मार्केट सुरू करण्याची तयारी लंके यांनी केली आणि तीन दिवसातच हे मार्केट उभारुन पुर्ण झाले आहे.

आज दुपारी 5 वाजता पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते भाजीपाला बाजाराचे उदघाटन करण्यात येणार आहे. बाबूशेठ राक्षे यांच्या सहकार्यातुन बेलवंडी फाटा येथील पेट्रोल पंपाशेजारी असणाऱ्या दोन एकर जागेत सायंकाळी हा बाजार भरणार असुन त्यामुळे पारनेर, श्रीगोंदा व शिरुरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नाथाभाऊ पाचर्णे यांचा शेतकऱ्यांसाठी संघर्ष…
तर्डोबाची वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे, शिवसेना शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ आणि बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज सय्यद यांनी शेतकऱ्यांची बाजु घेत शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पोलिस स्टेशनला निवेदन देऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आडमूठ पणाची भूमिका घेत बाजार पहाटे चार वाजताच सुरु ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच नाथाभाऊ पाचर्णे, योगेश ओव्हाळ, फिरोज सय्यद यांना पोलिसांकडुन 149 ची नोटीसही देण्यात आली. परंतु नाथाभाऊ पाचर्णे यांनी शेवटपर्यंत शेतकऱ्यांची साथ सोडली नाही. रोज सायंकाळी 6 वाजता ते शेतकऱ्यांसाठी बाजारात येऊन त्यांच्या अडचणी सोडवायचे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ते ‘हिरो’ ठरले आहेत.