शिरुर तालुक्यात ऊसतोडणी करताना आढळले ४ बिबट्याचे बछडे

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळा येथे पंढरीनाथ धोंडीबा लंघे या शेतक-याच्या उसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी करत असताना बिबट्याचे ४ बछडे आढळून आले आहे. (दि १९) रोजी याच ऊसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी मजूरांवर बिबट्या धावून आल्याची घटना घडली होती.

यावेळी प्रसंगावधान राखून मजूरांनी आरडाओरडा केला व तेथून पळ काढला. यामध्ये एका महिला मजूराच्या डोळ्याला जखम झाली असून यामधून ऊसतोडणी मजूर थोडक्यात बचावले आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच वन अधिकारी ऋषिकेश लाड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून तात्काळ पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बिबट्या मात्र जेरबंद झाला नसून, ऊसतोडणी करताना बिबट्याचे ४ बछडे आढळून आले आहे. वनविभागाच्या वतीने बछड्यांना सुरक्षित पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून या बछड्यांना बिबट मादीच्या स्वाधीन केले जाणार आहे. अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सविंदणे परीसरात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक वेळा बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन ठार झाले आहे. दिवसा शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सविंदणे येथे ऊसतोडणी करताना बिबट बछडे आढळून आले असून, घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी आहेत. आवश्यक त्या उपाययोजना करून बछड्यांना सुरक्षित पद्धतीने मादीच्या स्वाधीन केले जाणार आहे. परीसरातील नागरीकांनी रात्रीच्या वेळी फिरताना खबरदारी घ्यावी, बिबट्या किंवा बछडे आढळून आल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी.

मनोहर म्हसेकर

वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर