Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी बोकाळली; गुन्ह्यांची माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात गुन्हेगारी बोकाळली असुन अनेक गुन्ह्यांची उकलं करण्यात शिरुर पोलिसांना अपयश आले आहे. काही महिन्यांपुर्वी शिरुर पोलिस स्टेशनचा चार्ज संजय जगताप यांनी घेतल्यानंतर सुरवातीला त्यांनी शिरुर शहर आणि पोलिस स्टेशन हद्दीत काही अवैध धंद्यावर कारवाया केल्या. परंतु ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.

 

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या एक ते दोन वर्षांपुर्वी घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास आजपर्यंत लागलेला नाही. तसेच शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत रोहीत्र चोरी, घरफोड्या, मारामारी तसेच अवैध धंद्याना मोठया प्रमाणात ऊत आला आहे. शिरुर पोलिस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर अवैध धंद्याना मोठया प्रमाणात ऊत आलेला आहे. परंतु शिरुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी मात्र फक्त ‘माया’ जमविण्यात व्यस्त असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे.

 

गुन्ह्यांची माहिती देण्यास शिरुर पोलिसांची टाळाटाळ…?
शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासुन अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडले असुन शिरुर पोलिस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी याबाबत पत्रकारांना माहिती देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेकवेळा गुन्हा घडल्यानंतर संबधित गुन्ह्यांची माहिती संदर्भात पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना फोन केला असता. मी माहिती घेतो, सांगतो अशी त्यांची ठरलेली सरकारी उत्तरे असतात. त्यामुळे गुन्ह्यांची माहिती नक्की कोणाकडून घ्यायची असा प्रश्न निर्माण होत आहे.