शिरुर पोलीसांची धडाकेबाज कारवाई 3 गावठी बनावटीच्या पिस्तुलासह 10 जिवंत काडतूस जप्त

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) मध्यप्रदेश येथुन गावठी पिस्तूल घेऊन आलेल्या आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे शिरुर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडुन 1 गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 4 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपुर्वी रांजणगाव MIDC पोलिसांनी 8 गावठी पिस्तूलसह आरोपीला अटक केली होती. त्यामुळे शिरुर तालुक्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

 

शिरुरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना 31 डिसेंबर 2023 रोजी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की मध्यप्रदेश येथुन निखिल एकनाथ चोरे (रा. डोंगरगण, ता. शिरुर, जि.पुणे) हा शिरुर एस.टी.स्टँड येथे येणार असुन त्याच्याजवळ 1 गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 4 जिवंत काडतूस आहेत. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी तातडीने सापळा पथक तयार करत शिरुरच्या एस टी स्टॅन्ड परिसरात सापळा रचत निखिल चोरे याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 25 हजार 400 रुपये किंमतीचे 1 गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 4 जिवंत काडतूस आणि एक निळ्या रंगाची बॅग असा मुद्देमाल जागीच जप्त करत आरोपीविरुध्द शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

 

दरम्यान अटक केलेला आरोपी निखील चोरे याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीतने सदरचे पिस्तुल व जिवंत काडतूस मध्यप्रदेश येथील उमरटी येथुन आणल्याचे सांगितले. तसेच त्याच्यासोबत विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांनी देखील त्यांच्याकडील फोर्ड कंपनीची एन्डेवर गाडी नं. एम.एच.१२ एस.एच. ३३४४ यामध्ये उमरटी, मध्यप्रदेश येथुन २ पिस्तुल व ६ राऊंड आणल्याचे सांगितल्याने पोलिसांनी आरोपी विकास चोरे व शुभम चोरे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना गुन्हयात अटक करुन त्यांच्याकडुन ५० हजार ८०० रुपये किंमतीचे २ पिस्तुल आणि ६ जिवंत काडतूस तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली 20 लाख रुपये किंमतीची फोर्ड कंपनीची एम.एच.१२ एस.एच.३३४४ हि एन्डेवर चारचाकी गाडी जप्त केली आहे.

 

सदर गुन्हयात एकूण ७६ हजार २०० रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे एकूण ३ पिस्तुल आणि १० जिवंत काडतूस आरोपी १) निखिल एकनाथ चोरे (वय २०), २) विकास बाबाजी चोरे (वय २२), ३) शुभम सुरेश चोरे (वय २०) रा. डोंगरगण, ता. शिरुर, जि.पुणे यांच्याकडून जप्त करण्यात आले असुन त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

 

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, अमोल पन्हाळकर, पोलिसउपनिरीक्षक सुनिल उगले, एकनाथ पाटील, सहायक फौजदार गणेश देशमाने, पोलिस हवालदार परशराम सांगळे, पोलिस नाईक नाथसाहेब जगताप, पोलिस अंमलदार रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई, अर्जुन भालसिंग, दिपक पवार यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत असुन वरील तीनही आरोपीना न्यायालयाने दि 4 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.