अखेर मंगलदास बांदल कारागृहाबाहेर…

मुख्य बातम्या

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल हे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मागील बावीस महिन्यांपासून कारागृहात असताना त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्या नंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अखेर आज सतरा फेब्रुवारी रोजी मंगलदास बांदल हे कारागृहाबाहेर आले असल्याने पुणे जिल्ह्यात त्यांच्या अनेक कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष केला आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या विरुद्ध एप्रिल २०२१ मध्ये शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल होत त्यांना तातडीने अटक करण्यात आली होती, त्यांनतर त्यांच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढत गेल्याने त्यांच्या अडचणी आणि कोठडीत वाढ झाली, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गुन्हे घडल्याच्या आरोपावरून बांदलांसह त्यांचे काही जवळचे मित्र व काही बँक अधिकारी यांना देखील अटक झाली होती. तर बांदल यांच्या विरूध्द एकुण पाच गुन्हे दाखल होते. या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी होऊन त्यात बांदल यांचेसह सर्व अटक असलेल्या सहकाऱ्यांना उच्च न्यायालयाने जामीन केला होता.

सर्व कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण करून बांदल यांची सुटका झाल्याची माहिती ॲड. आदित्य सासवडे यांनी दिली. तर राज्यात घडलेल्या सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर पैलवान मंगलदास बांदल हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मंगलदास बांदल यांच्या सुटकेनंतर त्यांच्या पुणे जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.