ऑक्सिजन बेड असूनही ते ग्रामीण रुग्णालय कित्येक महिन्यांपासून बंदच

मुख्य बातम्या

ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरु करण्याची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे भव्य ग्रामीण रुग्णालय असून त्या ठिकाणी तब्बल तीस ऑक्सिजन बेड असताना केवळ कर्मचाऱ्यांअभावी ग्रामीण रुग्णालय बंद असल्याने सदर रुग्णालय तातडीने सुरु करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांनी केली असून वेळ प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथे गेल्या 4 वर्षापासून ग्रामीण रुग्णालयची इमारत तयार आहे. कोरोना काळामध्ये येथे ऑक्सिजन बेड सुरु करण्यात आले. मात्र कोरोना नंतर कर्मचारी नसल्याने सदर ग्रामीण रुग्णालय बंद झाले असल्याने संपूर्ण इमारत तसेच रुग्णालयातील सुविधा धूळखात पडल्या आहे. ग्रामीण रुग्णालय साठी असलेली नवीन रुग्णवाहिका देखील आतमध्येच अनेक दिवसांपासून वापराविना उभी आहे, तर ग्रामीण रुग्णालय बंद असल्याने पाबळ सह परिसरातील अनेक गावांच्या नागरिकांना उपचारासाठी पायपीठ करावी लागत असून अनेकांना उपचारा पासून वंचित रहावे लागत आहे.

पाबळ गावच्या आजूबाजूला अनेक दुर्गम वाड्या वस्त्या तसेच महिला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्यांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झालेले आहे. मात्र सदर ग्रामीण रुग्णालय नियमितपणे सुरु झाल्यास परिसरातील 40 हजार हून अधिक नागरिकांसह आदिवासी महिला, कामगार, शेतकरी यांना रुग्णालयाचा लाभ घेता येणार असल्याने सदर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरु करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांनी केली आहे.

रुग्णालय सुरु करण्याचे प्रयत्न; डॉ. वृषाली राऊत (वैद्यकीय अधीक्षक)

पाबळ ग्रामीण रुग्णालय येथे स्टाफची कमी असून नव्याने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे, कर्मचाऱ्यांची नेमणूक तसेच सदर ठिकाणी अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करुन लवकरात लवकर रुग्णालय सुरु करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वृषाली राऊत यांनी सांगितले.

आंदोलनाचा मार्ग अवलंबू; ॲड. रेश्मा चौधरी (शिवसेना संघटिका)

पाबळ ग्रामीण रुग्णालय सर्व सुविधा असताना देखील बंद असल्याने प्रशासनाकडे रुग्णालय सुरु करण्या बाबत पाठपुरावा सुरु आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय सुरु न केल्यास आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांनी सांगितले.