त्रिशंकू कौल दिल्यानंतर शिरूर नगर परिषदेत सत्तास्थापनेसाठी हालचाल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय खेळी रंगात; नेत्यांसोबत गुप्त बैठका, विजयी नगरसेवकांकडून पदांसाठी फिल्डिंग सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): बहुचर्चित शिरूर नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यानंतर प्रत्येक पक्ष व प्रत्येक नगरसेवकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून, आता सत्तास्थापना, उपनगराध्यक्षपद निवड तसेच विविध विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना जोर आला आहे. विविध पक्षांचे नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठका सुरू असून, विजयी नगरसेवकांकडून पदांसाठी फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू झाले आहेत.

या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ११ जागा मिळवत आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना नगराध्यक्षपदासह ७ जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ५ जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. एक अपक्ष नगरसेवकही विजयी झाला आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसून नगर परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

या परिस्थितीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष किंगमेकर ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष रवी ढोबळे यांनी उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या निवासस्थानी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या उपस्थितीत आम्ही राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत जाण्यास तयार असल्याचे सूचित केले होते. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोक पवार यांनी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनच घेतला जाईल, असे सांगत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.

दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनीही सत्ता स्थापनेचा दावा केला असून भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र कोणताही पक्ष आपली भूमिका उघडपणे मांडण्यास तयार नाही.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती एकत्र लढेल अशी चर्चा असताना ऐनवेळी भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने राजकीय गणिते बिघडली. यामुळे इच्छुकांची पळवापळवी झाली आणि अनेक जुनी समीकरणे तुटली. एकेकाळी जवळीक असलेले नेतेही या निवडणुकीनंतर वेगवेगळ्या बाजूंना उभे ठाकले आहेत.

स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी राजकीय घोडेबाजार रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपनगराध्यक्षपदासाठी जातीय समीकरणे महत्त्वाची ठरण्याची शक्यता असून बहुजन समाजातील नगरसेवकाला संधी मिळण्याची चर्चा आहे. तर विषय समित्यांची अध्यक्षपदे पक्षीय ताकदीनुसार वाटली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

स्वीकृत नगरसेवक पदासाठीही फिल्डिंग

शिरूर नगर परिषदेत तीन स्वीकृत नगरसेवक घेण्याची तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून एक स्वीकृत नगरसेवक नेमण्याचा प्रयत्न सुरू झाला असून यासाठीही इच्छुकांची फिल्डिंग लागली आहे. कोणाला संधी मिळते आणि सत्ता कुणाच्या हाती जाते, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.