रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सौरभ दसगुडे यांचा सन्मान

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक, आई आशा वर्कर तर वडील रांजणगाव MIDC मध्ये कंत्राटी कामगार म्हणुन नोकरी करतात. अशा खडतर परिस्थितीत आई-वडिलांच्या कष्टाच चीज करत मुलगा MPSC चा अभ्यास करुन पोलिस उपनिरीक्षक (PSI) झाल्याने साहजिकच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. रामलिंग मधील दसगुडे मळा येथे राहणारा कु सौरभ गोरक्षनाथ दसगुडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्याची वाजत-गाजत मिरवणुक काढत सन्मान करण्यात आला. यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनेही सौरभ दसगुडे याचा सन्मान करण्यात आला.

सौरभची घरची परिस्थिती अतिशय नाजूक असतानाही अतिशय खडतर प्रवास करत त्याने हे यश संपादन केले असुन यात त्याची जिद्द, चिकाटी, मेहनत याचे फळ त्याला मिळाले. सौरभची आई कौशल्या दसगुडे या रामलिंग येथे आशा वर्कर म्हणून काम करतात. तर वडील गोरक्षनाथ दसगुडे हे रांजणगाव MIDC त कंत्राटी कामगार म्हणुन कंपनीत नोकरी करतात. त्या दोघांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेत मुलाला उच्च शिक्षण दिले. त्यामुळे सौरभच्या या यशात त्याच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे.

आपल्याकडे समाजात अनेक कुटुंब श्रीमंत आहेत. तरी सुद्धा त्यांची मुले उच्च पदावर नसतात. त्यामुळे नुसताच पैसा असून उपयोग नाही तर त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी असावी लागते. म्हणून सर्व तरुण मुला-मुलांनी सौरभचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. तसेच सौरभने पोलिस खात्यात प्रमाणिकपणे काम करुन समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवावा असे मत व्यक्त करत त्याच्या पुढील वाटचालीसाठी रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांच्यावतीने सौरभ दसगुडे आणि त्याच्या कुटुंबाचा शाल,श्रीफळ आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी रामलिंगचे उपसरपंच यशवंत कर्डिले, रमेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रमेश दसगुडे, गोरक्षनाथ दसगुडे, डॉ वैशाली साखरे, राणी शिंदे, मयुरी दसगुडे, मिरा परदेशी, कौशल्या दसगुडे तसेच महिला उपस्थित होत्या.