घोणस सापांच्या प्रजनन काळात काळजी घेण्याची गरज

शिरूर तालुका

शिक्रापूर: सध्या हिवाळा सुरु झालेला असताना घोणस सापांच्या प्रजननाचा काळ सुरु झालेला असल्यामुळे कित्येक घोणस साप शेतीसह मनुष्यवस्तीत येत असल्याने सर्पदंशाचे प्रमाण वाढू लागले असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी व्यक्त केला आहे.

हिवाळा सुरु होत असताना घोणस सारख्या अतिविषारी सापांचा प्रजनन काळ सुरु होत असल्याने कित्येक साप एकत्र येत असतात. सापांच्या प्रजनन काळामुळे साप एकत्र येत असतात त्यामुळे नागरिकांना सापांचे दर्शन होत असते. मात्र घोणस साप हा अजगराच्या साम्या प्रमाणे असल्याने अनेकजण घोणस सापाला अजगर समजून जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र परिणामी दुर्घटना घडल्या जातात.

शेतात काम करताना तसेच ऊस तोड करताना देखील घोणस सापांच्या दंशाच्या घटना घडत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना पायात बूट घालून काम करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सर्प जनजागृती करण्याची देखील गरज निर्माण झालेली आहे, तर सध्या नागरिकांनी सापांपासून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.

सध्या घोणस सापांचा प्रजनन काळ सुरु असल्यामुळे एकाच ठिकाणी दोन हून अधिक साप आढळून येत असतात मात्र नागरिकांनी सापांच्या जवळ न जाता वनविभाग तसेच जवळील सर्पमित्रांशी संपर्क केल्यास होणाऱ्या दुर्घटना टाळता येऊ शकतात असे पुणे जिल्ह्यातील सर्प अभ्यासक अमर गोडांबे यांनी सांगितले.