शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील गुनाट हे गाव विद्यमान आमदार माऊली कटके यांनी काही महिन्यांपुर्वी मोठ्या गाजतवाजत ‘दत्तक’ घेतल्याची घोषणा करत “गावाचा सर्वांगीण विकास करणार” असा शब्द दिला होता. पण आज या दत्तक गावातील स्मशानभुमी मात्र अंधार, दुर्गंधी आणि दुर्लक्षाचे प्रतीक बनली आहे.
रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गुनाट येथील थोरात कुटुंबातील एका वृद्ध नागरिकाचे निधन झाले. रात्री ८ वाजता अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत पोहोचले. पण तिथे वीज नव्हती, पाणी नव्हतं आणि सभोवताली पुर्ण अंधार पसरलेला होता. त्यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांना मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात अंत्यविधी करावा लागला.
या अंधारात एकीकडे अंत्यविधीसाठी रचली जाणारी चिता आणि एकीकडे नातेवाईकांचे अश्रू हे दृश्य इतकं हृदयद्रावक होतं की उपस्थितांचा कंठ दाटून आला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त करत “जिवंतपणी सरकारकडून सुविधा नाहीत आणि मृत्यूनंतर स्मशानातसुद्धा उजेड नाही. हे दत्तक नव्हे तर ‘दुर्लक्षित’ गाव झालंय.” असे उदगार काढले.
या स्मशानभूमीत वीज कनेक्शन नाही, पाण्याची टाकी नाही, रस्त्यांचीही दयनीय अवस्था आहे. इतकेच नव्हे तर परिसरात दारुचे अड्डे सुरु असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या सर्व परिस्थितीने नागरिक संतप्त झाले आहेत. “ज्यांनी गाव दत्तक घेतलं, त्यांनी त्याकडे पाहिलं तरी आहे का…? अंधारात अंत्यसंस्कार करताना आम्ही कोणाकडे बघायचं…?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
तसेच गावकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि आमदारांना तातडीने वीज व पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांनी स्मशानभूमीतच ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत गावच्या सरपंच रोहिणी गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपुर्वी स्मशानभुमीतली विज चालु होती. मात्र आज (दि १२) रोजी शॉर्टसर्किट झाल्यामुळे विज पुरवठा खंडित झाला होता.
शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
Video; शिरुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी हातभट्टी तसेच देशी-विदेशी दारु उध्वस्त