विठ्ठलवाडीत शेतातील पिके नांगरुन कुटुंबाला मारहाण

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे शेताच्या वादातून शेतकऱ्याच्या शेतातील पिकांसह जनावरांचा चारा 3 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान करत शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश पांडुरंग गवारी, दिपक दत्तात्रय गवारी, महेश दत्तात्रय गवारी, संभाजी पांडुरंग गवारी, भूषण गुरुनाथ गवारी, गुरुनाथ केरबा गवारी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील नवनाथ हंबीर हे शेतात काम करत असताना योगेश गवारी व त्यांचे साथीदार एम एच १२ आर एफ ०९६७, एम एच १२ जे एन ६८३९ व एम एच ३८ बी ३०८६ हे तीन ट्रॅक्टर घेऊन हंबीर यांच्या शेतात आले आणि शेतातील जनावरांचे गवत, टोमॅटो, कोथंबीर हे पिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान केले यावेळी नवनाथ हंबीर व त्यांच्या कुटुंबियांना ट्रॅक्टर घेऊन आलेल्या इसमांना अडवण्याचा प्रयत्न करत तुम्ही पिकांचे ट्रॅक्टरने नुकसान का करता असे म्हटले असता हंबीर यांच्या सह त्यांचे भाऊ, भावजय, मुलगा यांना मारहाण करत जखमी केले तर मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी चक्क अकरा वर्षीय बालिकेला देखील मारहाण केली असून तुम्ही जर पुढे आलात तर ट्रॅक्टरच्या खाली घालू अशी धमकी देऊन हंबीर यांच्या शेतात योगेश गवारी यांच्या नावाची पाटी लावून मारहाण करणारे निघून गेले.

याबाबत नवनाथ ज्ञानोबा हंबीर (वय ४५) रा. मीरगव्हाण वस्ती विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी योगेश पांडुरंग गवारी, दिपक दत्तात्रय गवारी, महेश दत्तात्रय गवारी, संभाजी पांडुरंग गवारी, भूषण गुरुनाथ गवारी, गुरुनाथ केरबा गवारी सर्व रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.