शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात आज रविवार दि १२ ऑक्टोबर २०२५ सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण परीसर हादरला आहे. आज सकाळी ९:४५ च्या सुमारास भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे (वय ५ वर्षे ६ महिने) या चिमुकलीचा मृत्यू झाला.

या घटनेच्या वेळी तिचे आजोबा अरुण देवराम बोंबे हे त्यांच्या घरामागील शेतात जेसीबीने काम करत होते. त्याचवेळी नात शिवन्या आजोबांना पाणी देण्यासाठी शेतात आली असता, शेजारच्या सुमारे चार फूट उंच ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप टाकली. काही क्षणातच तो चिमुकलीला ओढत ऊसात घेऊन गेला.

या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आजोबांनी हे दृश्य पाहताच दोनशे फुटांवरून धावत जाऊन बिबट्याच्या तावडीतुन शिवन्याला सोडवले. तत्काळ तिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच बोंबे कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेनंतर पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, वनविभागाकडून तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.

बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यांचा वाढता धोका…

पिंपरखेड-जांबूत या दहा किलोमीटर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही सातवी घटना आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांना भीतीच्या सावटाखाली जीवन जगावे लागत आहे. रात्री तर सोडाच, पण आता दिवसा सुद्धा बाहेर पडताना लोक जीव मुठीत धरून फिरत आहेत. तात्काळ वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त केला नाही तर येता आगामी काळामध्ये वनविभागाविरुद्ध मोठे जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Video; शिरुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी हातभट्टी तसेच देशी-विदेशी दारु उध्वस्त

शिरुर; कारेगाव येथील यश इन चौक बनत चाललाय अवैध धंद्यांचा अड्डा…?

शिरुर तालुक्यात घरात शिरुन महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल