रांजणगाव पोलिसांनी व्हर्लफुल कंपनीतील चोरी प्रकरणी आरोपी अटक करत 10 रेफ्रिजरेटर केले जप्त

क्राईम मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील व्हर्लफुल कंपनीमधुन 91 फ्रिज रांजणगाव ते मल्लपुरम, केरळ येथे कंटेनर चालक घेऊन जात असताना कंटेनर मधील 11 फ्रिज कंटेनरचे सिल तोडुन फ्रिजची विक्री करुन कंटेनर चालक फरार झाला होता. त्यानंतर दिपक ज्योतीबा खैरे (रा. वडगावशेरी, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे 15 फेब्रुवारी 2024 रोजी कंटेनर चालकाच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. रांजणगाव पोलिसांनी तपासा दरम्यान सदर कंटेनर चालकास ताब्यात घेत त्याच्याकडुन 10 फ्रिज जप्त केले आहेत.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव MIDC तील व्हर्लपुल कंपनीतुन 91 फ्रिज रांजणगाव ते मल्लपुरम, केरळ येथे कंटेनर क्र. NL 01 N 7934 यामध्ये बाळु थोरे हा घेवुन जात असतांना त्याने त्यापैकी 1 लाख 61 हजार 749 रुपये किंमतीचे 11 फ्रिज कंटेनरचे सिल तोडुन विक्री करुन तो फरार झाला होता. याबाबत दिपक खैरे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकास आरोपीचा तसेच चोरीला गेलेल्या फ्रिजचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

 

त्यानुसार रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलिस हवालदार वैज्जनाथ नागरगोजे, तेजस रासकर आणि विजय शिंदे यांनी गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीचा तसेच चोरीला गेलेल्या मालाचा शोध घेत असतांना कंटेनरचालक आरोपी बाळु राजेंद्र थोरे (वय 28) रा. तिंतरवाणी, ता. शिरुर कासार, जि.बीड याला अहमदनगर येथुन गुन्हयामध्ये ताब्यात घेवुन दि 2 मार्च 2024 रोजी अटक केली आहे.

 

त्यानंतर पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे तपास केला असता आरोपीने सदरचे फ्रिज हे कौफ, ता.जि. उडपी, राज्य- कर्नाटक येथील एक हॉटेलमध्ये विक्री करण्यासाठी ठेवले असलेले मिळुन आले. सदर आरोपीकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेले 1लाख 47 हजार 40 रुपये किंमतीचे एकुण 10 फ्रिज जप्त करण्यात आलेले असुन उर्वरीत एका फ्रिजबाबत तपास सुरु आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस हवालदार वैज्जनाथ नागरगोजे, तेजस रासकर, विजय शिंदे, पोलिस नाईक माणिक काळकुटे यांनी केला आहे. या गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार तेजस रासकर हे करत आहेत.