शिरुर तालुक्यात महिला सर्पमित्रांनी पकडला आठ फुटी अजगर

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात अनेक सर्पमित्र असुन पुरुषांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन महिला सर्पमित्रही सर्परक्षणासाठी काम करत असल्याचे दिसुन येत आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे नुकताच दोन सर्पमित्र असलेल्या महिलांनी आठ फूट लांबीचा अजगर पकडला. त्यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

 

शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील संत निळोबाराय उद्यान या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अजगर जातीचा भला मोठा साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तिथे जमलेल्या लोकांपैकी रवींद्र मोरे यांनी नेचर गार्ड ऑर्गनायझेशन अध्यक्ष सर्पमित्र गणेश टिळेकर यांना कॉल करुन या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच काही वेळातच सर्पमित्र गणेश टिळेकर, शुभांगी टिळेकर, सोनाली चव्हाण, वैभव निकाळजे, रोहित मुळे, राजेंद्र डफळ हे इतर सदस्यांसह तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले.

 

त्यावेळी अंधार आणि उद्यानामध्ये दाट झाडी झुडपं असल्याने अथक प्रयत्नानंतर त्या आठ फुटी अजगरास पकडण्यात या सर्वांना यश आले. सर्पमित्रांनी तिथे जमलेल्या लोकांना सापाविषयी माहिती सांगत त्यांची शंका दुर केल्याने तात्काळ वनविभागाला कळविण्यात आले. त्यानंतर पकडलेल्या अजगरास वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रमोद पाटील यांच्या समक्ष वनविभागाच्या हद्दीमध्ये सोडून देण्यात आले.

 

सर्परक्षणासाठी सर्पमित्र महिलांचा पुढाकार…

शिरुर तालुक्यामध्ये पुरुष सर्पमित्रांसोबत महिला देखील सर्प रक्षणामध्ये अग्रेसर आहेत तळेगाव येथील सर्पमैत्रीण शुभांगी टिळेकर ह्या गेल्या सात वर्षापासून त्यांचे पती सर्पमित्र गणेश टिळेकर यांच्यासोबत साप पकडण्याचे काम करत असून त्यांनी आत्तापर्यंत हजारो सापांसोबत कोल्हा, घुबड, मोर, उदमांजर तसेच विविध प्राणी व पक्षांना वाचवण्याचे काम केले आहे.