वृक्षतोडीमुळे पंचायत समितीचे सुशोभिकरणाचे उदघाटन वादाच्या भोवऱ्यात

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीचे सुशोभिकरण या कार्यालयातील गटविकास अधिकाऱ्यानी केलेल्या मोठ्या वृक्षतोडीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुशोभिकरणाच्या उद्घाटनाचा सोहळा (दि. २८) मार्च रोजी होणार होता. कार्यक्रमाची जय्यत तयारीही झाली. कोनशिलाही मोठ्या थाटात लावण्यात आली होती. परंतू अधिकाऱ्याच्या वृक्षतोडीच्या कारनाम्यामुळे मुख्य कार्यकारी आधिकारी, आमदार, खासदार व मान्यवर न आल्याने हा उद्धाटनाचा कार्यक्रम होऊ शकला नसल्याची चर्चा मात्र तालुकाभर चांगलीच रंगली आहे.

सुशोभिकरणाच्या नावाखाली पंचायत समितीच्या या आधिकाऱ्याने रात्रीच्या वेळी वडाची मोठी दोन झाडे व इतर झाडे तोडून त्याची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावल्याने शिरुरच्या नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी आधिकाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास नाथा पाचर्णे हे येत्या ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाच्या तयारीत आहेत.

या विषयी पंचायत समीतीच्या आधिकाऱ्याबरोबर असणारे कर्मचारी यशवंत वाटमारे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की वृक्षतोडीबाबत मला काहीही माहीती नसून रात्रीच्या वेळी साहेबांचा अचानक फोन आल्याने मी उपस्थित झालो होतो. या विषयी गटविकास आधिकारी अजित देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, मी फक्त वडाच्या फांदया छाटल्या आहेत,असे मोघम उत्तर त्यांनी दिले आहे.

परंतू वडाच्या झांडाबरोबर तेथील इतर झाडे बुंध्यापासून कापलेली दिसत आहे. ही झाडे कोणाला व किती पैश्यात विकली…? त्याची कोणत्या वाहनाने वाहतुक करण्यात आली…? याचा सखोल तपास करणे गरजेचे असून गटविकास आधिकारी अजित देसाई हे झांडाचे कसाई झाले असुन त्यांनी अनेक मुक्या पक्षांचा जीव घेतला आहे. या वडाच्या झाडाला वटपोर्णिमा सणाला महीलांनी जन्मोजन्मी हाच पती मिळू दे यासाठी बांधलेले दोरे अजूनही त्या झाडाला तसेच राहीले आहेत. या आधिकाऱ्यावर तातडीने कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनिल जाधव, अविनाश घोगरे यांनी केली आहे.