बेल्हा-जेजुरी रस्त्यावर गतिरोधक बसवा अन्यथा आंदोलन

मुख्य बातम्या

शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांचा इशारा

शिक्रापुर (शेरखान शेख) शिरुर तालुक्यातून जाणाऱ्या नव्याने बनवण्यात आलेल्या बेल्हा-जेजुरी रस्त्यावर अनेक अपघात होत असल्याने सदर रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची वारंवार विनंती करुन सुद्धा प्रशासन दखल घेत नसून येत्या दहा दिवसात या रस्त्यावर गतिरोधक न बसवल्यास रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी दिला आहे.

Ranjangaon marathon
Ranjangaon marathon

शिक्रापूर (ता. शिरुर) येथून गेलेला बेल्हा-जेजुरी महामार्ग नव्याने झालेला असल्याने सदर रस्त्यांवर वाहतुकीचे प्रमाण वाढलेले असुन या रस्त्याने अनेक वाहने भरधाव वेगाने जात असतात मात्र या महामार्गाच्या कडेला जातेगाव बुद्रुक, मुखई, धामारी, पाबळ हि गावे असून रस्त्यांच्या कडेलाच शाळा, महाविद्यालय, बाजार, बँका आहेत, बेल्हा जेजुरी महामार्गावर कुठेही गतिरोधक नसल्याने मुख्य गावांच्या ठिकाणी अनेक लहानमोठे अपघात होत आहेत. गेल्या दोन महिन्यात या रस्त्यावर अपघात होऊन दहा ते बारा जणांचा मृत्यू झालेला असून कित्येक नागरिकांना गंभीर दुखापती देखील झालेल्या आहेत. यापूर्वी शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महामार्ग विभाग यांच्याकडे तक्रारी करत सदर रस्त्यांवर गावांच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केलेली असताना काहीही उपाययोजना झालेली नसून संबंधित अधिकाऱ्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे.

मात्र अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अपघातात अनेक स्थानिकांना जीव गमवावा लागत असल्याने भविष्यात रस्त्यांवरील शाळा, महाविद्यालयांना धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात असुन येथे प्रशासनाने तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी शंकर जांभळकर यांनी केली असून येत्या दहा दिवसात प्रशासनाने सदर रस्त्यावर गतिरोधक न बसवल्यास या रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे देखील शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी सांगितले आहे.