कानून के हाथ बहोत लंबे होते है…ना FIR ना पुरावा… तरीही रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव येथे एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोक्याला आतून जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर रांजणगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मयताच्या तपासावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस करत आरोपीला ठोकल्या बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे कानून के बहुत हाथ लंबे होते है… या वाक्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगावच्या हद्दीतील फिनिक्स सिटी येथील प्लॉटिंगमधील ऑफिसच्या शेडमध्ये प्लॉटिंगमध्येच काम करणारा विठ्ठल केशव शेळके (वय 35) रा. मुंडेकरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर याचे प्रेत दि 5 ऑक्टोबर 2023 रोजी प्लॉटिंगमध्येच सापडले होते. याबाबत स्वप्नील नाजुकराव सदानशिव (वय 31) सध्या रा कारेगाव, ता.शिरुर, जि. पुणे यांनी खबर दिल्याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते. या मयताचे शवविच्छेदन शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी यांनी केल्यानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू त्याच्या डोक्यामध्ये अंतर्गत जखमा होवुन झाले असल्याचा अहवाल दिला.

 

त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी सदर घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तसेच साक्षीदारांकडे अधिक तपास केला असता. मयत व्यक्ती मिळुन आलेल्या ठिकाणी एक सिमेंटचा मोठा ठोकळा मिळुन आला. तसेच त्यावर रक्ताचे डाग आढळून आल्याने रोकडे यांनी याघटनेतील साक्षीदारांकडे अधिक तपास केला असता यातील मयत व्यक्ती सोबत त्या ठिकाणी झोपण्यसाठी पोपट बाळासाहेब गाडेकर आणि वामन बबन चौघुले (रा. जवळा, ता. पारनेर, जि.अहमदनगर) असे दोघेजण असुन मयत व वामन चौघुले यांच्यामध्ये झोपण्याच्या कारणावरुन दारु पिवुन वाद झाल्याने त्या वादातुन वामन चौघुले याने विठ्ठल केशव शेळके याच्या डोक्यात सिमेंटचा ठोकळा टाकुन खुन केला असल्याचे निष्पन्न झाले.

 

त्यानंतर सुहास रोकडे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना देवुन रवाना केले. परंतु या गुन्हयातील निष्पन्न झालेला आरोपी वामन बबन चौघुले हा मिळेल तेथे मजुर अड्ड्यांवर काम करणारा कामगार असुन तो मोबाईल वापरत नाही. तसेच मागील दहा ते पंधरा वर्षापासुन तो पत्नीपासुन विभक्त राहत असल्याने त्याच्या मुळगावी देखील जात नसल्याने आरोपीचा शोध घेण्याचे पोलीसांसमोर मोठे अव्हान निर्माण झाले होते.

 

आरोपीच्या तपासासाठी पोलीस बनले मजुर…

त्यामुळे तपास पथकाने शिरुर, कारेगाव, सणसवाडी, रांजणगाव, कोरेगाव-भिमा या गावातील 20 ते 25 मजुर अड्यांवर जाऊन चौकशी केल्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना सदरचा आरोपी हा हडपसर, पुणे परिसरामध्ये असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने तपास पथकाने सदर परिसरात आरोपीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला. परंतु तरीसुद्धा आरोपी मिळुन येत नसल्याने उमेश कुतवळ यांनी एक नामी शक्कल लढवत हडपसर येथील मजुर अड्यावर मजुर बनुन काम पाहिजे असे सांगुन मजुर अड्यावर सकाळ संध्याकाळ थांबुन राहुन तेथील मजुरांशी ओळख करुन व त्यांचा विश्वास संपादन करुन आरोपी वामन बबन चौघुले हा काम करत असलेल्या दोन तिन ठिकाणांची व ठेकेदारांची माहिती काढुन त्यांच्याकडे तपास करुन दि 12 ऑक्टोबर 2023 रोजी आरोपीस पुणे येथील हडपसर परिसरातुन ताब्यात घेवुन अटक केली.

 

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार वैज्जनाथ नागरगोजे, संतोष औटी, तेजस रासकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.