रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना बहिर्जी नाईक पुरस्कार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना गावठी पिस्टलच्या तपासकामी वेळोवेळी वेषांतर करुन पिस्टल विक्री करणाऱ्या आरोपीशी संपर्क साधत उत्कृष्ट तपास केल्याबद्दल नुकताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या राज्यातुन कामगार कामानिमित्त आलेले असल्याने औद्योगीक परिसरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टलचा वापर करत असल्याबाबतची माहिती रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या तपास पथकास मिळाली. त्यावेळी तपास पथकातील पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी वेळोवेळी वेषांतर करुन आरोपीकडे त्यांना सुद्धा एक पिस्टल विकत पाहिजे असल्याची माहिती पिस्टल विक्री करणारा आरोपी संकेत संतोष महामुनी (वय 20) रा.सरदवाडी, ता. शिरुर, जि. पुणे. याच्यापर्यंत पोहच केली.

 

त्यानुसार आरोपीने वेषांतर करुन फिरणारे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना पिस्टल मिळवुन देतो असे सांगीतले. त्यानुसार तपास पथकाने सापळा लावुन सदर आरोपीस दि 18 सप्टेंबर 2023 रोजी ताब्यात घेवुन त्याच्याविरुध्द आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन सदर तपास पथकाच्या मदतीने एकुण 08 पिस्टल, 05 जिवंत काडतुसे व 03 सिनेस्टाईल लोखंडी कोयते असे एकुण 2 लाख 86 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

 

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनची गावठी पिस्टल बाबत हि सर्वात मोठी कारवाई असुन तपास पथकातील पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी वेषांतर करुन आरोपीची गोपनीय माहिती काढल्याने त्याला मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे विजय शिंदे यांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.