ajit pawar oath

शिरूरकरांची प्रतिक्रिया! आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत आज बसण्याची वेळ आली…

मुख्य बातम्या राजकीय

राजकीय घडामोडीबाबत शिरूरकरांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका…

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अचानक नाटयमय घडामोडी घडल्यानंतर शिरूर शहरात त्याचे पडसाद उमटले आहे. दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. मात्र, पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रियांना नकार देत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार हेदेखील अजित पवार यांच्या सोबत आहेत का? अशी चर्चा रंगू लागली. त्यानंतर वृत्त वाहिन्यांवर अशोक पवार, दिलीप वळसे पाटील, निलेश लंके यांचा पाठिंबा असल्याचे वृत्त दिसताच अनेक पदाधिकारी नॉट रिचेबल झाले आहे. काहींनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, काहींनी तर ज्यांच्याबरोबर आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्यासोबत आज बसण्याची वेळ आली असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार उपमुख्यमंत्री होऊनही शिरूर शहरात कुठेही फटाके अथवा जल्लोष साजरा केला गेलेला दिसला नाही.

शिरूर तालुका राजकीयदृष्ट्या शिरूर-आंबेगाव, शिरूर-हवेली असा विभागला गेला आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील ३९ गावे ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतात. तेथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आमदार असून, शिरूर हवेलीमध्ये अॅड. अशोक पवार हे आमदार आहेत. शिरूर शहरात पारनेर तालुक्यातील अनेक नागरिक वास्तव्यास असून, पारनेरचे आमदार निलेश लंके याच्याशी शिरूरकरांचा थेट संबंध आहे. त्यामुळे तीनही मतदारसंघांचे आमदार काय भूमिका घेतात? याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. परंतु, हे तीनही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याने अनेक पदाधिकारी बुचकळ्यात पडले आहे. तीनही मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असून, थेट भूमिका मांडण्यास अनेक जण नकार देत आहेत. अचानक झालेल्या घटनेने राजकीय पेच निर्माण झाला असल्याने पुढील दोन-तीन दिवसांत पदाधिकारी आपली भूमिका स्पष्ट करतील.

माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, ‘आम्ही दिलीप वळसे पाटील यांना मानणारे आहोत. त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास निधी दिला असून, त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले. तर शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले की, ‘दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते असून, आम्ही त्यांच्या मागे ठाम आहोत. अजित पवार हे आमचे नेते आहेत. ते जे निर्णय घेतील त्यास आमचा पाठिंबा आहे.’ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे व शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

शिरूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सन १९९० पासून टोकाचा राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे ही नवी झालेली युती कार्यकर्त्यांना कितपत पचनी पडेल? ज्यांच्याबरोबर आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याच बरोबर मांडीला मांडी लावून बसावे लागणार, हे कार्यकर्त्यांच्या मनात रुजायला फार काळ लागणार आहे. यासंदर्भात आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.