ठाणे: मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा आहे. अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठीचा स्वीकार करणे हीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागासह राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या **‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’**च्या सांगता समारंभात शिंदे बोलत होते.
१०५ दिवसांच्या या अभियानात तब्बल १.२५ लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. या सर्वांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा केवळ अभियानाचा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवादभाषा” हा महाराष्ट्राचा जयघोष असून, मराठीची भक्ती ही महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे, असे सांगत त्यांनी मराठीला अस्मिता, स्वाभिमान आणि मायबोलीचे स्थान असल्याचे नमूद केले.
‘कायद्याने नाही, प्रेमाने भाषा शिकते’
मराठी शिकण्यासाठी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाचा मार्ग स्वीकारल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कौतुक करत शिंदे म्हणाले की, “कायद्याने नाही, प्रेमाने भाषा शिकते.” मराठी शिकणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांची टिंगल करू नका, उलट त्यांच्याशी मराठीत संवाद साधा, असे आवाहनही त्यांनी केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी स्वाभिमानाच्या विचारांचा उल्लेख करताना शिंदे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासह महिला, मुली आणि विविध घटकांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे महामंडळाचा ५० कोटी रुपयांचा निधी भविष्यात १,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र उद्योग, स्टार्टअप, जीडीपी आणि परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात आघाडीवर असल्याचा दावा करत दावोसमध्ये राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर सामंजस्य करार झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये संसदेने मान्यता दिलेले अधिकृत ‘वंदे मातरम्’ गायले जावे, अशी सूचनाही त्यांनी केली. “मायबोलीची भक्ती आणि मराठीचा सन्मान हीच महाराष्ट्राची खरी शक्ती आहे,” असा संदेश देत त्यांनी अभियानाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, अभियान समन्वयक सल्लागार डॉ. ज्योती ठाकरे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, रिक्षा-टॅक्सी चालक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.