शिरुर तालुक्यातील त्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या पोहचली सहावर…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) येथील युवक गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेल्यांनतर गाडीचा अपघात होऊन जागीच चार जण ठार झालेले असताना (दि. २५) रोजी जखमी असलेला युवक समाधान श्रावण साळवे हा उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला असताना पुन्हा आमदाबादकरांना धक्का बसला असून अपघातातील गंभीर जखमी असलेला दुसरा युवक ओंकार जालीधंर गोरखे (वय १८) याचे नगर येथे उपचार सुरू असताना (दि. २६) रोजी उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता सहा वर गेली आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी दिवशी (दि. २३) आमदाबाद येथील तरुण छोट्या टेम्पोतून शनिशिंगणापूर व देवगड येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर कामरगावजवळ झालेल्या या अपघातात विजय अवचिते, राजेंद्र साळवे, मयूर साळवे व धीरज मोहिते यांचा मृत्यू झाला, तर सातजण जखमी झाले होते. जखमींपैकी तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते. त्यातील समाधान साळवे याचा शनिवारी तर रविवारी ओंकार जालिंदर गोरखे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ओंकार हा शिक्षण घेत होता. तसेच वाजंत्री म्हणुन काम करीत होता. गावातील युवा कलावंत अपघातात मरण पावल्याने आमदाबाद ग्रामस्थांवर मोठी शोककळा पसरली आहे. तो अकरावीत होता व वाजंत्री कलाकार म्हणून परिसरात प्रसिद्ध होता. आमदाबाद गावातील हे तरुण युवा कलावंत अपघातात मरण पावल्याने आमदाबाद ग्रामस्थ, नातेवाईकांवर मोठा दु :खाचा डोंगर छोसळला आहे.