Mathadi

रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली चाललीये लुट अरे ड्रायव्हर भाऊ जागा हो ऊठ…

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे वसुल केले जात आहेत. परंतु पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक पोलिस प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचे दिसत असुन यामुळे बाहेरच्या राज्यातून रांजणगाव MIDC त माल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांना कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे.

रांजणगाव MIDC तील झामील स्टील कंपनीचे एच आर मॅनेजर राहुल भागवत यांनी दि 14 ऑगस्ट 2021 रोजी 200 रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माथाडी कामगार काशिनाथ चंदनराव पाचंगे यांच्यावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. परंतु माझ्यावर कंपनी प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल करुन अन्याय केला असल्याचे सांगत पाचंगे यांनी या विरोधात मुंबई येथे उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. परंतु सध्या रांजणगाव MIDC त ढोकसांगवी गावच्या हद्दीत असणाऱ्या एक ते दोन कंपनीच्या बाहेर माथाडीच्या बोगस पावत्या फाडल्या जात असताना रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे तसेच उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी हे मात्र माथाडी बोर्डाने आमच्याकडे रीतसर तक्रार केली तर आम्ही कारवाई करु असे सांगत आहेत. मग माझ्यावर जेव्हा 200 रुपयासाठी गुन्हा दाखल केला त्यावेळेस हिच अट का लावण्यात आली नाही असा सवाल काशिनाथ पाचंगे यांनी केला आहे.

याबाबत पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे अध्यक्ष व्ही व्ही घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या सचिवांच्या कानावर ही गोष्ट घातली असुन याबाबत पोलिस प्रशासनाकडुन सुद्धा याबाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत. तसेच आम्ही माथाडीचे इन्स्पेक्टर पाठवून सदर बेकायदेशीर प्रकाराबाबत माहिती घेऊन येत्या काही दिवसात योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रांजणगाव MIDC तील झामील स्टील कंपनीत काशिनाथ पाचंगे हे रीतसर माथाडी कामगार असताना आणि त्यांचा काहीच दोष नसताना फक्त 200 रुपयांची माथाडीची पावती फाडली म्हणुन त्यांच्यावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला गेला. परंतु ज्या गाडीचा नंबर फिर्यादीत नमुद केलेला आहे ती गाडी कंपनीत आलेलीच नसल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे झामील कंपनीचे एच आर मॅनेजर राहुल भागवत तसेच माथाडी बोर्डाचे अधिकारी आणि रांजणगाव पोलिस यांची मिलीभगत असुन काशिनाथ पाचंगे यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचा आमचा संशय आहे.

अ‍ॅड आम्रपाली धिवार

वकील, हायकोर्ट