रांजणगाव MIDC पोलिसांनी जळगाव ते कल्याण असा प्रवास करत घरफोडी करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे घरफोडी करुन रोख रकमेसह 1 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळुन गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी रांजणगाव MIDC पोलिसांनी पाचोरा, जळगाव, कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरातील शोध घेऊन आरोपीला चिंचपाडा (कल्याण) येथुन अटक करुन त्याच्याजवळ असलेला 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन आनंद नाना पवार (वय 31 वर्षे) रा. नगर-जवळा, ता. पाचोरा, जि. जळगाव, सध्या रा. कल्याण ईस्ट,चिंचपाडा, जि. ठाणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप कौतिक माळी (वय 37 वर्ष) हे रांजणगाव गणपती येथील उज्वल इंटरनॅशनल स्कुल जवळ भाड्याच्या खोलीत राहतात. दि 24 जानेवारी 2023 ते 5 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान फिर्यादी बाहेरगावी गेल्याने आनंद पवार याने त्यांच्या घरात चोरी करुन रोख रकमेसह 1 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. विशेष म्हणजे आरोपीने कुठलाही पुरावा मागे सोडला नव्हता. त्यामुळे रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे आणि पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी तपास पथकातील दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, विजय शिंदे यांना आरोपीला पकडण्यासाठी सुचना दिल्या होत्या.

सदर आरोपीने कोणताही पुरावा मागे न सोडल्याने तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणद्वारे आरोपीचा शोध घेण्यासाठी थेट पाचोरा, जळगाव, कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरातील शोध घेऊन आरोपी आनंद नाना पवार याला नवी मुंबई चिंचपाडा (कल्याण) या ठिकाणी ताब्यात घेतले. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत.