निमगाव म्हाळुंगीत किरकोळ वादातून व्यक्तीला मारहाण

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका शेतातील वादातून इसमाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून मारहाणीमध्ये व्यक्तीच्या हाताचे बोट तुटल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी दिनकर गोरडे व गुण्या उर्फ अभिनव संभाजी गोरडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हरीचंद्र रणदिवे यांच्या शेजारील संभाजीर गोरडे यांची शेती हरीचंद्र यांचा पुतण्या यशवंत याने घेतली होती. त्यानंतर सदर जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले मात्र २० एप्रिल रोजी हरिचंद्र हे घरासमोर असताना संभाजी व त्यांचा मुलगा गुण्या तेथे आले त्यांनी हरिचंद्र यांना शिवीगाळ, दमदाटी करत आम्ही शेतातील माती चोरून नेली असे पुतण्याला का सांगितले असे म्हणून लोखंडी गजाने मारहाण करत जखमी केले. झालेल्या मारहाणीत हरीचंद्र यांच्या हाताच्या बोटाचा काही भाग देखील तुटला. यावेळी हरिचंद्र यांचा आवाज ऐकून त्यांचा भाऊ व आदी लोक आले त्यामुळे मारहाण करणारे निघून गेले.

याबाबत हरीचंद्र शंकरराव रणदिवे (वय ७२) रा. रणदिवे वस्ती निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संभाजी दिनकर गोरडे व गुण्या उर्फ अभिनव संभाजी गोरडे दोघे रा. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष मारकड हे करत आहे.