शिरूर तालुक्यातील गावांमध्ये फ्लेक्स बॅनरवर बंदी

मुख्य बातम्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची तयारी प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेली असून नुकतेच शिरुर तालुक्यातील गावांमध्ये फ्लेक्स बंदीचे आदेश काढण्यात आलेले आहेत.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे १ जानेवारी २०२३ रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. यापूर्वी फ्लेक्स मुळे 2 समाजात वादावादी होऊन गुन्हे दाखल झालेले असताना पोलिसांसह प्रशासन देखील विशेष खबरदारी घेत असतात. 1 जानेवारी रोजी राज्याच्या काना कोपऱ्यातून भीम अनुयायी कोरेगाव भीमा येथे हजेरी लावत असतात. मात्र सदर कार्यक्रमाचे निमित्त अनेक ठिकाणी फ्लेक्स बॅनर लावले जातात अनेकदा त्यावर काही वेळा आक्षेपार्ह मजकूर असतो. त्यामुळे विविध जाती धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

सदर कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावा या अनुषंगाने प्रांताधिकारी पुणे संतोषकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार शिरूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये २ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ पर्यंत फ्लेक्स बॅनर वर बंदीचे आदेश दिले आहेत, जर कोणाला फ्लेक्स बॅनर लावायचे असतीलच तर त्यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, जागा मालक आणि सबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगी घेणे आवश्यक राहील असा दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश देण्यात आले आहे.

सदर कायद्याचे उल्लंघन करण्याऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही प्रांताधिकारी संतोष देशमुख यांनी संबंधित पोलीस विभागाला दिले असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिले आहे.