रांजणगाव पोलीसांनी विद्युत रोहीत्राच्या तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या तीन चोरांना अटक करुन 15 गुन्हे आणले उघडकीस

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव या गावातील विद्युत रोहित्रांच्या तांब्याच्या चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालु होते. सदर चोरी प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला वेळोवेळी अज्ञात आरोपींविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सततच्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतक-यांना हाताशी आलेल्या पिकाला पाणी देणे आवघड झाले होते. या चोरी प्रकरणांची पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक तसेच शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गंभीर दखल घेवुन सदरच्या चोरीचा छडा लावण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना दिलेल्या होत्या.

 

त्यानुसार पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार वैज्जनाथ नागरगोजे, संतोष औटी यांना हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. तपास पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणांना भेटी देवून तांत्रीक व गोपनिय माहितीच्या आधारे गुन्हयांची उकल करण्याचा कसोशिने प्रयत्न करत असतांना पोलीस निरीक्षक ढवाण यांना गोपनिय बातमीदारामार्फत रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असे गुन्हे करणा-या आरोपींबाबत माहिती प्राप्त झाली होती.

 

त्यानुसार त्यांनी तपास पथकासह सापळा लावुन काही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता. तसेच त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी सदर गुन्हयांची कबुली दिली. रोहीत्र चोरी प्रकरणी आरोपी ईस्लाम शामद शेख वय (वय 30), वाल्मिक किसन कवडे (वय 30) दोन्ही रा. चितेगाव, ता. पैठण जि.औरंगाबाद, तसेच मजहर अजिजुला खान (वय 34 ) कोराडी, सहजापुर, वाळुंज एमआयडीसी यांना गुन्हयाच्या तपासकामी (दि. 13) सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेली आहे.

 

सदर आरोपिंनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील 5, शिक्रापुर पोलीस स्टेशन 4, राजगड पोलीस स्टेशन 3, शिरुर पोलीस स्टेशन 1, सासवड पोलीस स्टेशन 2 असे वेगवेगळ्या पोलिस स्टेशन हद्दीत एकुण 15 रोहीत्र चोरींच्या गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांच्याकडुन 450 कि.ग्रॅ. तांब्याच्या तारा व कॉईल गुन्हयात वापरलेले वाहन पिकअप टेम्पो असा एकुण 8 लाख रुपये किमतीचा माल पोलीसांनी जप्त केला आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, विनोद शिंदे, निळकंठ तिडके, सुहास रोकडे, शुभांगी कुटे, सहायक फौजदार दतात्रय शिंदे, सुभाष घारे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, हेमंत इनामे, पोलिस हवालदार संतोष औटी, वैज्जनाथ नागरगोजे, अभिमान कोळेकर, कल्पेश राखोंडे, गणेश आगलावे, विलास आंबेकर, पोलिस नाईक माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, माणिक काळुकूटे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सहायक फौजदार सुभाष गारे, पोलिस हवालदार अभिमान कोळेकर, कल्पेश राखोंडे, गणेश आगलावे हे करत आहेत.