शिरुर तालुक्यातील विनयभंग प्रकरण; पिडितेची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे धाव

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार करडे गावात घडला होता. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने संबंधित रेशन दुकानदारा विरोधात फिर्याद दाखल केली होती.

फिर्याद दाखल केल्यानंतर संबंधित महिलेवर करडे गावातील काही राजकीय व्यक्तींनी फिर्याद मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव आणला. परंतु पिडीत महिला आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने आरोपीच्या एका मुलाने (दि १५) जुलै रोजी तर (दि १६) जुलै रोजी करडे गावातील स्वयंघोषित गोल्डमॅन असलेल्या एका गावगुंडाने शिरुर-बायपास रस्त्यावर चारचाकी गाडी आडवी लावुन पिडीतेला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

या दोन्ही घटनेबाबत पिडीत महिलेने शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. परंतु त्यानंतरही आरोपीच्या नातेवाईकांकडुन संबंधित पिडीत महिलेला वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातुन त्रास देण्याचे सत्र सुरुच असल्यामुळे अखेर आज (दि २१) रोजी पिडीत महिलेने पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल यांची भेट घेत आपल्यावरील अन्यायाबाबत कथन केले. तसेच आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांकडुन आपल्या जीवाला धोका असल्याबाबत तक्रार अर्ज दिला.

यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंग गिल्ल यांनी शिरुर पोलिसांची कान उघडणी करत पिडीत महिलेला योग्य ती मदत करण्याच्या सुचना दिल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. पिडीत महिलेला शिरुर पोलिसांकडुन योग्य ती मदत न मिळाल्याने तिने थेट पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांची भेट घेत आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली असल्याने शिरुर पोलिसांचा निष्क्रियपणा पुन्हा एकदा समोर आल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

रेशन दुकानातील CCTV गायब…?

शासकीय नियमानुसार रेशन दुकानात CCTV लावणे बंधनकारक आहे. करडे येथील रेशन दुकानात विनयभंगाची घटना घडली तेव्हा CCTV होता. परंतु विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो CCTV काढण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने हा CCTV काढला असल्याची लेखी तक्रार पिडीतेने पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.

(क्रमशः) 

शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी

शिरुर; विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी ‘त्या’ फिर्यादी महिलेवर राजकीय पुढाऱ्यांचा दबाव…?

शिरुर पोलिसांचा गुन्हेगारांना खरंच धाक राहिलाय का…? विनयभंग प्रकरणात पिडीतेला जिवे मारण्याची धमकी