शिरुर (तेजस फडके) घोडनदी (शिरुर) येथील न्यायालयाने तब्बल १३ वर्षे चाललेल्या चेक अनादर (Cheque Bounce) प्रकरणात एक महत्त्वपुर्ण निकाल देत आरोपीस तब्बल ३८ लाखांचा दंड आणि सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणुक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, व्यापारी व व्यावसायिक वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरु आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घोडनदी येथील प्रसिद्ध व्यापारी हरकचंद माणिकलाल खाबिया यांनी सन २०१२ मध्ये आरोपी अरिफ गणी शेख यास व्यावसायिक कारणासाठी विश्वासाने १९ लाख रुपये हातउसने म्हणुन दिले होते. या रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने फिर्यादीस १९ लाखांचा धनादेश (Cheque) दिला होता. मात्र संबंधित धनादेश बँकेत जमा केल्यानंतर तो अनादरित (Bounce) झाला.
चेक बाऊन्स झाल्यानंतर फिर्यादीने कायदेशीर नोटीस देऊनही आरोपीकडुन रक्कम न मिळाल्याने फिर्यादीतर्फे अॅड भागवत दिघे यांनी दि. ०६ जुलै २०१३ रोजी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम १३८ अंतर्गत घोडनदी (शिरुर) न्यायालयात दावा दाखल केला होता.
सदर प्रकरणात दीर्घकाळ सुनावणी सुरु राहिली. तब्बल १३ वर्षांच्या सुनावणीनंतर घोडनदी येथील न्यायाधीश दत्तात्रय बी. डोमाळे यांनी दि २३ मार्च २०२६ रोजी निकाल देत आरोपी अरिफ गणी शेख यास दोषी ठरवले.
त्यानंतर न्यायालयाने आरोपीस ३८ लाख रुपयांचा दंड ठोठावत, तो फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. तसेच आरोपीस सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या निकालामुळे चेक अनादर (Bounce) करुन आर्थिक फसवणुक करणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला आहे. “व्यवहारात विश्वासघात करुन चेक देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रकार आता महागात पडू शकतो,” अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या निकालामुळे चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये न्यायालय कठोर भुमिका घेत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले असुन, आर्थिक व्यवहार करताना कायदेशीर सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
शिरुरमध्ये वादळी पावसाचा तडाखा; एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्याने रांजणगाव MIDC तील पाणी पुरवठा ठप्प
शिरुर; कारभारणीच्या नथीतुन कारभारीच मारतात तीर; पदाधिकारी महिलेच्या पतीं चा वाढतोय हस्तक्षेप…?
शिरुर (घोडनदी) न्यायालयाचा धनादेश अनादर प्रकरणी दोषी आरोपीला दणका