शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचा सुळसुळाट; रात्रगस्त वाढविण्याची मागणी 

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून अज्ञात चोरट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. शिरुर शहरातील जोशीवाडी येथे पिकअप गाड्यांचे टायर, आनोसेवाडी, कळवंतवाडी, ट्रान्सफॉर्मरमधील तांब्या, घरफोड्या व किरकोळ चोरीच्या घटनांनी शिरुर तालुका अक्षरशः चोरट्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे.

बेट भागातील टाकळी हाजी परिसरात सलग चोऱ्यांच्या घटना उघडकीस येत असताना पोलीस यंत्रणेची रात्रगस्त आणि गुप्तचर यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचा संतापजनक आरोप नागरिकांकडून होत आहे. काही दिवसांतच उभ्या वाहनांचे टायर चोरीला जाणे, शेतातील डी.पी. फोडून तांब्याच्या तारांची चोरी, तसेच घरासमोरून साहित्य लंपास होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

विशेष म्हणजे, चोऱ्यांच्या घटनांनंतर गुन्ह्यांची नोंद होत असली तरी आरोपी अटक होत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत चालले आहे. “गुन्हे दाखल झाले, पण चोर पकडले कुठे…?” असा थेट सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. रात्रगस्तीचे फोटो, गस्त डायरी व सीसीटीव्ही तपास खरोखरच प्रभावीपणे होत आहेत का…? की फक्त कागदोपत्रीच कारवाई सुरु आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिरुर शहरातील बाजारपेठ, वस्ती भाग, औद्योगिक परिसर व गावठाणात रात्री पोलीस उपस्थिती दिसत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. शिरुर पोलीस स्टेशन प्रशासनाने तात्काळ रात्रगस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास गतिमान करावा व चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी ठोस मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. चोऱ्यांचा हा वाढता कहर थांबवला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देत आहेत.