शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात महिन्यांपासुन फरार असलेल्या टोळीप्रमुख योगेश केशव मचाले (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याला शिरुर पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वाघोली (ता.हवेली) येथील खांदवेनगर परिसरातून ताब्यात घेतले. 

दि १९ मार्च २०२६ रोजी मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर सूत्रधार शिंदे याचा फोटो न लावल्याच्या कारणावरुन वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मिथुन ऊर्फ अमोल आनंदा चौगुले (वय ३१, रा. मांडवगण फराटा) यांच्याशी काही जणांनी वाद घातला. त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा, तसेच दगडफेक आणि शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले करीत आहेत.

पोलिसांना पाहताच आरोपीचा पळण्याचा प्रयत्न…

टोळीप्रमुख योगेश मचाले हा खांदवेनगर, वाघोली येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार विनोद मोरे आणि पोलीस अंमलदार सुशिल सुरवसे यांना मिळाली. शिरुरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना झाले. पोलिसांना पाहताच मचालेने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाठलाग करुन त्याला शिताफिने ताब्यात घेण्यात आले. मचाले याच्यावर खंडणी, मारहाण आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार विनोद मोरे, राहुल भवर, शरद वारे, अक्षय कळमकर तसेच पोलीस अंमलदार सुशिल सुरवसे, निखील रावडे, दादाराव नागरे, नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, सचिन भोई, अंबादास थोरे, अजय पाटील, रविंद्र काळे आणि वैभव शेलार यांच्या पथकाने केली. 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत