कारेगावच्या अ‍ॅड संग्राम शेवाळे यांच्या “लंडन सफरनामा” पुस्तकाचे 9 सप्टेंबर रोजी पुणे येथे प्रकाशन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

राजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील सुपुत्र अँड संग्राम शेवाळे हे लंडन येथे कायद्याचे (LLM) उच्च शिक्षण घेत असताना तेथील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक ,ऐतिहासिक , पर्यावरण , आर्थिक आदी विषयांबाबत आलेल्या अनुभवांचे वर्णन त्यांनी “लंडन सफरनामा” या पुस्तकात शब्दद्ध केले असुन या पुस्तकाचे पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.

 

लंडन व भारताचे गेले अनेक वर्षांचे नाते असून याबाबतचा संपूर्ण इतिहासाचा उल्लेख या पुस्तकात केला आहे, तसेच परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शासनाच्या विविध योजनाची माहिती पुस्तकात आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन ठरणार आहे. कारेगावच्या संग्राम शेवाळे यांनी (BALLB) चे शिक्षण हे पुणे येथील नामांकित भारती विद्यापीठ येथे पूर्ण केले आहे. लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेत असताना लंडनच्या संसदेसमोर भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र करून 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती उत्साहात साजरी केली होती.त्यांच्या या शिवजयंती सोहळ्यामुळे देशाची मान उंचावली आहे.त्याची दखल घेत देशातील सर्व समाज माध्यमांनी प्रसिद्धी दिली होती.

 

अ‍ॅड संग्राम शेवाळे हे जनता दल सेक्युलर विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असून,या संघटनेच्या माध्यमातून करोना काळात विद्यार्थ्यांना फी सवलत मिळावी,वस्तीगृह मिळावे ,तसेच जेवणाची राहण्याची सोय व्हावी म्हणून शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना सकाळ समूहातर्फे देण्यात येणारा “करोना योद्धा” पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्यावतीने “युवा भूषण” पुरस्काराने गौरविले आहे. तसेच शेवाळे यांचे देशाचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय व्ही.पी. सिंग यांच्या कुटुंबाशी सलोख्याचे संबंध आहेत.

 

जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांचे ते चिरंजीव असून वडिलांच्या विचारांचा व आदर्शांचा वारसा सक्षमपणे संग्राम पुढे चालवत आहे. “लंडन सफरनामा” हे पुस्तक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आर्थिक, इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी व परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास संग्राम शेवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या प्रकाशन सोहळ्यासाठी देशातून व राज्यातून सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती अ‍ॅड संग्राम शेवाळे यांनी केली आहे.