शिरुर पोलिसांनी ‘त्या’ सराईत आरोपीस ठोकल्या बेडया

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार संकेत ज्ञानदेव काळे, (वय २४) रा. निमोणे, (ता. शिरुर), जि. पुणे याने त्याच्या साथीदारांसह लोखंडी कोयता, तलवार, दांडके यासारख्या घातक हत्यारांच्या मदतीने यापूर्वी गंभीर गुन्हे करुन शिरुर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील निमोणे, निर्वी, गोलेगाव, शिरुर शहर आणि रांजणगाव एम. आय. डी. सी. परिसरात गुन्हेगारीच्या माध्यमातुन दहशत करत सामान्य नागरिकांमध्ये मोठी दहशत माजविण्याचे काम केले होते. बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथे पंक्चर दुकानात दुचाकीची पंक्चर काढत असताना पोलिसांनी सापळा रचुन संकेत काळे याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सराईत आरोपी नामे संकेत ज्ञानदेव काळे याने चार महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दोन साथीदारांसह निमोणे गावच्या हद्दीत साईगार्डन हॉटेलवर जावुन हॉटेलमध्ये घुसून वेटरला झोपेतुन उठवुन हॉटेल चालु ठेवण्याकरिता पाच हजार रुपयांची खंडणी मागत वेटरच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा घडल्यानंतर आरोपी संकेत काळे आणि त्याचे इतर दोन साथीदार हे पळुन गेल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता शिरूर पोलीस स्टेशनकडील वेगवेगळी पथके त्यांचा निमोणे, निर्वी, शिरूर, न्हावरा, श्रीगोंदा, बेलवंडी या परिसरात शोध घेत होते.

गुरवार (दि 20) रोजी पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सराईत आरोपी संकेत काळे याची बेलवंडी फाटा (ता.श्रीगोंदा) येथे त्याची दुचाकी पंक्चर झालेली असुन तो बेलवंडी फाटा येथे पंक्चर दुकानात पंक्चर काढत आहे. याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने याठिकाणी पोलिसांनी सापळा रचुन आरोपी संकेत काळे यास शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीविरुध्द यापुर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा, किडनॅपिंग, दुखापत, खंडणी, मारामारी, धमकावणे यासारखे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

शिरुर पोलिसांनी संकेत काळे यास (दि २१) रोजी शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला (दि. २५) पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपीकडे गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास चालु आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, शिरुरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस नाईक विनोद मोरे, नाथा जगताप, पोलिस अंमलदार रघुनाथ हाळनोर, पवन तायडे, नितेश थोरात, प्रविण पिठले, सचिन भोई यांनी केलेली आहे.